मानवी मनोरे रचून उंच दहीहंडीचा वेध घेणाऱ्या मुंबईतील गोविंदांना स्पेनपाठोपाठ आता अमेरिकावारीही घडणार आहे. निमित्त आहे ते अमेरिकेन नागरिकांना घडविल्या जाणाऱ्या महाराष्ट्र संस्कृती दर्शनाचे.महाराष्ट्र पर्यटन विभागाने अमेरिकेतील न्यूयॉर्क शहरामधील ‘टाईम्स स्केअर’मध्ये ‘महाराष्ट्र संस्कृती’चे दर्शन घडविणाऱ्या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. अमेरिकन नागरिक आणि परदेशस्थ भारतीयांना यानिमित्ताने १८ सप्टेंबर रोजी लेझीम, मल्लखांब, लावणी, भारुड आदींच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या संस्कृतीचे दर्शन घडविण्यात येणार आहे. गेल्या काही वर्षांमध्ये मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रामध्ये दहीहंडी उत्सव मोठय़ा प्रमाणावर साजरा होऊ लागला आहे. मानवी मनोरे रचण्याची स्पर्धेत सहभागी होणाऱ्या स्पेनमधील क्रीडापटू मुंबईतील दहीहंडी उत्सवाकडे आकर्षित झाले आणि ते २००६ मध्ये मुंबईत दाखल झाले. त्यानंतर संघर्ष प्रतिष्ठानने मुंबई-ठाण्यातील गोविंदांना स्पेनवारी घडविली. आता महाराष्ट्र पर्यटन विभागाने अमेरिकन नागरिकांना महाराष्ट्राच्या संस्कृतीचे दर्शन घडविण्याचा संकल्प सोडला आहे. त्या निमित्ताने मुंबईतील गोविंदांना अमेरिकावारी घडण्याचा निर्णय ‘संकल्प प्रतिष्ठान’चे सर्वेसर्वा सचिन अहिर यांनी घेतला आहे. मुंबईतील नामवंत गोविंदा पथकांतील एक-दोन गोविंदांची अमेरिकावारीतील पथकामध्ये वर्णी लागणार आहे. थरावर न लटपटता उभ्या राहणाऱ्या गोविंदांचा शोध अमेरिकावारीसाठी सुरू झाला आहे.अमेरिकेत जाणाऱ्या या पथकामध्ये केवळ १५ गोविंदांचा समावेश करण्यात येणार आहे. गोविंदाची निवड करण्याची जबाबदारी बृहन्मुंबई दहीहंडी उत्सव समन्वय समितीवर सोपविण्यात आली आहे. यापूर्वी स्पेनमध्ये मानवी मनोरे रचण्यासाठी गेलेल्या काही गोविंदांचाही विचार अमेरिकावारीसाठी होण्याची शक्यता आहे.