सुरूवातीच्या काळात फॅड म्हणून हिणवली गेलेली दिवाळी पहाटेच्या संगीत मैफलींची परंपरा आता चांगलीच मूळ धरू लागली आहे. सातत्याने नाविन्यपूर्ण उपक्रम राबविणाऱ्या ‘चतुरंग’ संस्थेने सुरूवातीला मुंबईत दिवाळीच्या पहाटे ‘वाहतो ही दुर्वाची जुडी’ नाटकाचा प्रयोग केला. त्याला चांगला प्रतिसाद मिळाला. दिवाळीच्या सकाळीही रसिक कार्यक्रमासाठी घराबाहेर पडू शकतात, हे या प्रयोगास मिळालेल्या उदंड प्रतिसादाने आढळून आले. ‘चतुरंग’ने अशा रितीने दिवाळीचा आनंद द्विगुणीत करण्याचा मार्गच जणू  रसिकजनांना दाखवून दिला. दिवाळी हा तसा कौटुंबिक, आप्तस्वकियांसोबत साजरा केला जाणारा सण. पहाट मैफलींनी दिवाळीला सार्वजनिक अधिष्ठान दिले. एरवी नरक चर्तुदशीच्या पहाटे रेडिओवर लागणारे नरकासुराचा वध हे कीर्तन ऐकत अभ्यंगस्नान, तुळशीसमोर कारीट फोडून आधी देवपूजा आणि मग अर्थात पोटपुजा.. हे दिवाळीचे घराघरातील पारंपरिक वेळापत्रक पहाटेच्या संगीत मैफलींनी बदलले.आता पहाटे चारला उठून, अभ्यंगस्नानासह सर्व अन्हिके उरकून सहा-साडेसहाला रसिक गाण्याच्या मैफलीला सभागृहात जागा अडवितात. पूर्वी रात्री सुरू झालेल्या संगीत मैफलींची भैरवी पहाटेचा कोंबडा आरवेपर्यंत सुरू असायची. आता आधुनिक काळात दिवाळी पहाट मैफलींनिमित्त नेमके उलटे होते इतकेच. मुंबई परिसरात सुरू झालेली दिवाळी पहाट संगीत मैफलींची परंपरा आता महाराष्ट्रातील सर्व लहान-मोठय़ा शहर, उपनगरांमधून रूजू लागली आहे. अनेक नामवंत आणि दिग्गज गायकांबरोबरच नवोदित कलावंतही दिवाळीच्या दिवसात उपलब्ध झालेल्या या नव्या व्यासपीठावर आपली कला सादर करतात. शास्त्रीय-उपशास्त्रीय, सुगम संगीत, चित्रपटसंगीत असे वैविध्यपूर्ण कार्यक्रम दिवाळीच्या काळात होतात. पहाटेच्या या मैफिलींमध्ये गाण्याबरोबरच रुचीपालट म्हणून खमंग गप्पांचाही बेत आखला जातो. पूर्वी ऑस्केस्ट्रामध्ये मिमिक्री असायची, तशा या गप्पा. व्यावसायिक नाटक, दूरचित्रवाणी मालिका अथवा सिनेसृष्टीतील अभिनेता-अभिनेत्री या गप्पाष्टकात सहभागी होतात. एवढय़ा भल्या पहाटे गाणं ऐकण्यासाठी घराबाहेर पडलेल्या रसिकांच्या हाती चहाफराळ देण्याची कल्पकताही काही आयोजक दाखवितात.
दिवाळी अंक हा तर महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वैशिष्टय़ांचा एक अविभाज्य घटक आहे. या दिवाळी अंकांच्या प्रकाशनही हल्ली पहाटेच्या संगीत मैफलींच्या व्यासपीठावर होऊ लागले आहे..              

Story img Loader