अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांना आपली जुनी पुस्तके, अभ्यास साहित्य आणि शैक्षणिक उपकरणे ‘ना नफा ना तोटा’ तत्त्वावर विकून देण्यास मदत करणारा एक आगळावेगळा उपक्रम मुंबईतील एका अभियांत्रिकी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी सुरू केला आहे. या विद्यार्थ्यांनी त्यासाठी एक संकेतस्थळ सुरू केले असून या माध्यमातून माजी विद्यार्थ्यांचे सेकंडहॅण्ड शैक्षणिक साहित्य माफक किमतीला विकत घेता येऊ शकेल. यामुळे सेकंडहॅण्ड शैक्षणिक साहित्याच्या खरेदीविक्रीच्या व्यवहारातून आजी-माजी विद्यार्थ्यांच्या खिशातून मधल्या पुस्तकविक्रेत्याच्या खिशात जो वरकड नफा जात होता तो आता वाचणार आहे. रग्गड शुल्काबरोबरच अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक साहित्यावरही दरवर्षी भरमसाठ पैसा खर्च होतो. संदर्भ पुस्तके, विद्यापीठाच्या सोडविलेल्या प्रश्नपत्रिका, नोट्स, प्रवेश परीक्षांची पुस्तके आणि इतर शैक्षणिक पुस्तकांचा यात समावेश आहे. हे साहित्य खूप महाग असल्याने फारच थोडे विद्यार्थी ते नव्याने खरेदी करतात. बहुतेकदा पैसे वाचविण्यासाठी विद्यार्थी हे साहित्य सेकंडहॅण्डच घेतात. या शिवाय तांत्रिक उपकरणे, प्रयोगशाळेत लागणारे विशिष्ट कपडे, कॅलक्युलेटर आणि इतर स्टेशनरी साहित्यही सेकंडहॅण्डच खरेदी केले जाते. विद्यार्थी हे साहित्य वर्षभर अत्यंत काळजीपूर्वक वापरून पुन्हा त्याच दुकानदारालाच विकतात. अर्थातच या व्यवहारात खरेदीच्या किंमतीपेक्षा फारच कमी रक्कम हातावर पडते. दुकानदार हेच सेकंडहॅण्ड साहित्य चढय़ा दराने दुसऱ्या विद्यार्थ्यांना विकतात.
एकाच शैक्षणिक साहित्यावर दोन्हीकडून नफा कमावण्याच्या या धंद्यामुळे दोन्ही विद्यार्थ्यांचे मोठेच नुकसान होते. हे नुकसान टाळण्यासाठी वांद्रय़ाच्या ‘थाडोमल शहानी अभियांत्रिकी महाविद्यालया’च्या तिसऱ्या वर्षांच्या आशय शहा आणि कौशल रूपारेलिया या शेवटच्या वर्षांला असलेल्या विद्यार्थ्यांनी वैशिष्टय़पूर्ण संकेतस्थळ विकसित केले आहे. तसेच नवीन नागपाल, प्रथमेश कोवारकर, अदिती सबनीस यांनी या संकेतस्थळाच्या डिझाईन, संकलन आदीची जबाबदारी घेतली आहे.
विद्यार्थ्यांना ज्या साहित्याची विक्री करायची असेल त्या साहित्याची जाहिरात कोणत्याही मोबदल्याविना संकेतस्थळावर देता येईल. वस्तूची विक्री झाल्यानंतरही कोणतेही कमिशन घेतले जाणार नाही, असे या उपक्रमाच्या प्रसिद्धीची जबाबदारी हाताळणाऱ्या अनिष मॅथ्यू याने सांगितले. अनिष याच महाविद्यालयात तिसऱ्या वर्षांला आहे.
कॉपीपेस्ट गैरवापर
या संकेतस्थळावर विद्यार्थ्यांनी तयार केलेले शैक्षणिक प्रकल्पही विकता येणार आहेत. पुढच्या विद्यार्थ्यांना संदर्भ म्हणून या प्रकल्पांचा वापर करता यावा म्हणून ही सोय असणार आहे. कारण प्रकल्पांच्या बांधणीसाठीही मोठय़ा प्रमाणावर पैसा, वेळ आणि बौद्धिक कष्ट पडतात. त्यामुळे, माजी विद्यार्थ्यांना आपले प्रोजेक्ट या संकेतस्थळावर विकता येतील. माजी विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या प्रोजेक्टचा पुढच्या विद्यार्थ्यांना संदर्भ म्हणून उपयोग करता यावा, यासाठी ही सोय करून दिल्याचे संकेतस्थळाच्या निर्मात्यांचे म्हणणे आहे. परंतु, हे प्रकल्प ‘कॉपीपेस्ट’ करून आपल्या नावावर खपविण्याचाही गैरवापर होऊ शकतो.
संकेतस्थळाचा पत्ता – http://www.engineerpond.com

Story img Loader