प्रत्येकाच्या कामाला, स्वभावाला आणि वागण्याला एक विशिष्ट मर्यादा असते. अर्थात त्यास हद्ददेखील म्हणता येईल. या मर्यादेतच काम करण्याची सवय बहुतेकांच्या अंगवळणी पडली असल्याने ती हद्द ओलांडण्यास सहसा कोणी तयार होत नाही. भले मग तो दुसऱ्याच्या हद्दीतील कचरा उचलण्याचा प्रश्न असो अथवा शहराच्या प्रथम नागरिकाच्या शांत अन् समंजस प्रतिमेचा. तथापि, या प्रश्नात हद्दीचे कारण पुढे करण्यात आल्यावर ती बाब दुसऱ्याच्या मूळ स्वभावाची मर्यादा ओलांडण्यास कारणीभूत ठरली तर त्याला काय म्हणावे? सराफ बाजारातील कचरा उचलण्यावरून गुरुवारी घडलेला प्रकार काहीसा याच धाटणीचा म्हणता येईल.
शहरातील स्वच्छता आणि कचरा उचलण्याचे काम कशा पद्धतीने चालते, हे शहरवासीयांच्या चांगलेच अंगवळणी पडले आहे. बहुधा महापौरांना आपली यंत्रणा कशा पद्धतीने काम करते, हे ज्ञात नसल्याने त्यांच्या संतापाचा कडेलोट झाला असावा. दोन ते तीन दिवसांपासून सराफ बाजारातील कुंडीतून कचरा उचलण्यात न आल्याने परिसरात दरुगधी पसरली. सणोत्सवाच्या काळात दरुगधीमुळे व्यावसायिकांसह ग्राहकांना नाक दाबणे भाग पडले. महत्त्वाची बाब म्हणजे, हा तर खुद्द महापौरांचा प्रभाग. तिथेच इतकी दुरवस्था असेल तर उर्वरित नगराची काय स्थिती असेल याचा विचार न केलेला बरा. स्थानिकांनी कचरा ‘जैसे थे’ असल्याविषयी महापौरांकडे संपर्क साधून तक्रारी केल्या. याआधीही हा भाग अस्वच्छता व कचऱ्यामुळे चांगलाच गाजला होता. त्यामुळे महापौरांनी तत्काळ आरोग्य विभागाला सूचित करीत कचरा त्वरित उचलण्याचे फर्मान काढले. परंतु, त्या दिवशी हा कचरा उचलला गेला नाही. म्हणजे महापौरांचे आदेशही कचराकुंडीत टाकले गेले. परिणामी, दुसऱ्या दिवशी दरुगधी वाढतच गेल्याने स्थानिकांनी पुन्हा दाद मागितली आणि काहीशा वैतागलेल्या महापौरांनी आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांना सोबत घेऊन सकाळी नऊ वाजता थेट सराफ बाजार गाठला.
दरम्यानच्या काळात आरोग्य विभागाने पूर्व आणि पश्चिम विभागात स्वच्छतेच्या काम करणाऱ्या सफाई कामगारांना या ठिकाणी बोलावून घेतले होते. साफसफाईची ही कामे ठेकेदारी पद्धतीने केली जातात. महापौरांनी आदेश दिल्यावर खरे तर कोणताही वाद न घालता कचरा हटविण्यास प्राधान्य देण्याची गरज होती. परंतु या ठिकाणी सफाईच्या हद्दीचा वाद उपस्थित करण्यात आला.
 पूर्व विभागाच्या हद्दीतील कचरा पश्चिम विभागातील स्वच्छतेचे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी का उचलावा, असा प्रश्न निरीक्षक शंतनू बोरसे यांनी उपस्थितांसमोर महापौरांना केला. या भागातील अस्वच्छतेच्या वारंवार येणाऱ्या तक्रारींमुळे आधीच बेजार झालेल्या महापौरांच्या संयमाची या प्रश्नाने जणूकाही परीक्षाच पाहिली. हद्दीवरून वाद न घालता आधी कचरा उचलावा, असे महापौरांनी बजावूनही ठेकेदाराच्या कर्मचाऱ्यांकडून अशी भूमिका घेतली गेल्याने गोंधळ उडाला. संतापाच्या भरात महापौर आपल्या अंगावर धावून आल्याची तक्रार निरीक्षकासह कर्मचाऱ्यांनी प्रसार माध्यमांकडे केली. शहराच्या प्रथम नागरिकाने कंत्राटी कामगारांशी असे वर्तन करणे अपेक्षित नाही. या संदर्भात मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याकडे दाद मागणार असल्याचे संबंधितांकडून सांगण्यात आले. या घटनाक्रमामुळे हबकलेल्या आरोग्य विभागाने पर्यायी व्यवस्था करून कुंडीतील कचरा उचलून नेला. या वेळी नेमके काय घडले, याबद्दल या विभागाच्या अधिकाऱ्यांनी कानावर हात ठेवले.
महापौर अ‍ॅड. यतिन वाघ यांची प्रतिमा खरे तर वेगळी आहे. पालिका कर्मचाऱ्यांच्या कार्यशैलीमुळे त्यांनाही आपल्या स्वभावाची सीमारेषा ओलांडणे भाग पडले की काय, अशी साशंकता व्यक्त होत आहे. परंतु, महापौरांनी असा कोणताही प्रकार घडला नसल्याचे स्पष्ट केले. पूर्व व पश्चिम प्रभागातील सफाई कामगारांमध्ये कचरा उचलण्यावरून हद्दीचा वाद आहे. यामुळे या भागातील कचरा उचलला जात नव्हता. हद्दीचा वाद उपस्थित न करता परिसर स्वच्छ ठेवावा, असे आपले म्हणणे होते. या वेळी काही जणांकडून उडवाउडवीची उत्तरे दिली गेली. परंतु, कर्मचाऱ्यांचे आरोप तथ्यहीन असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. या संपूर्ण घडामोडीत हद्दीवरून निर्माण झालेल्या वादातून नेमकी कोणी हद्द ओलांडली आणि कोणी नाही, हा या वादाशी संबंधित ज्याचा-त्याचा प्रश्न असला तरी स्वच्छतेची कामेही नियमितपणे होत नसल्याने ‘आता मात्र हद्द झाली’ असे म्हणण्याची वेळ नागरिकांवर आली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा