प्राध्यापकांचे परीक्षेच्या कामावरील बहिष्कार आंदोलन आणि विद्यापीठाच्या परीक्षा दोन्ही सध्या सुरू असले, तरी विद्यापीठ प्रशासनासमोर उत्तरपत्रिकांच्या मूल्यांकनाचा प्रश्न निर्माण झाला आहे. संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठात मूल्यांकनाचे काम उद्या २४ एप्रिलपासून सुरू होत आहे. दुसरीकडे अमरावती विभागातील सुमारे ४० टक्के परीक्षा केंद्रांवर सहकेंद्राधिकाऱ्याविना परीक्षा सुरू असल्याचे बिकट चित्र आहे.
प्राध्यापकांच्या असहकार आंदोलनाच्या सावटाखाली अमरावती विद्यापीठाच्या परीक्षा १५ एप्रिलपासून सुरू झाल्या. गेल्या ४ फेब्रुवारीपासून राज्यात एम.फुक्टो. या संघटनेने परीक्षेच्या कामांवर बहिष्कार टाकला आहे. त्यामुळे विद्यापीठाला पहिल्या टप्प्यातील परीक्षा पुढे ढकलाव्या लागल्या. आता सरकार आणि विद्यार्थी संघटनांकडून दबाव आल्याने १५ एप्रिलपासून परीक्षा सुरू करण्याचा निर्णय विद्यापीठ प्रशासनाने घेतला. कंत्राटी प्राध्यापक आणि महसूल कर्मचाऱ्यांच्या मदतीने सध्या परीक्षा घेतल्या जात आहेत.
‘नुटा’ या संघटनेने परीक्षेच्या कामावर बहिष्कार टाकला असला, तरी परिक्षांना विरोध करायचा नाही, अशी भूमिका घेतली. गेल्या ४ फेब्रुवारीपासून प्राध्यापकांचे असहकार आंदोलन सुरू आहे. सरकारचे प्रतिनिधी आणि प्राध्यापक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांमध्ये अनेकदा चर्चा झाल्या, पण आंदोलनाबाबत तोडगा निघू शकलेला नाही. राज्य शासनाने सहाव्या वेतन आयोगाच्या थकबाकीपोटी १ हजार ५०० कोटी रुपयांची रक्कम मंजूर करून ती येत्या ३० एप्रिलपर्यंत देण्याचा निर्णय घेतला आहे. प्राध्यापक संघटनेच्या नेट-सेटग्रस्त प्राध्यापकांविषयीच्या पूर्ण मागण्या मान्य झालेल्या नाहीत. सरकारने आश्वासने दिली आहेत, पण संघटनेला लेखी पत्र दिले नसल्याने आंदोलन मागे घेण्यासंदर्भात निर्णय घेता येणार नाही, असे संघटनांचे म्हणणे आहे.
गेल्या १९ एप्रिलला संघटनांचे प्रतिनिधी आणि उच्च शिक्षणमंत्री राजेश टोपे यांच्यात झालेल्या चर्चेतूनही तोडगा निघू शकला नाही. मागण्या पुढे रेटण्यासाठी येत्या २५ एप्रिलला मुंबई येथील आझाद मैदानावर राज्यभरातील प्राध्यापक धरणे आंदोलन करणार आहेत, अशी माहिती ‘नुटा’चे अध्यक्ष डॉ. प्रवीण रघुवंशी यांनी दिली. दरम्यान, विद्यापीठासमोर परीक्षा घेतानाच अनेक अडचणी आहेत. अनेक परीक्षा केंद्रांवर सहकेंद्राधिकारी नाहीत. त्यामुळे परीक्षेचे संचालन करणाऱ्या यंत्रणेवर चांगलाच ताण आला आहे. परीक्षेनंतरच्या उत्तरपत्रिकांच्या मूल्यांकनाचे काम प्राध्यापकांच्या आंदोलनामुळे ठप्प पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. येत्या काही दिवसात आंदोलनावर तोडगा न निघाल्यास अमरावती विद्यापीठात गेल्या वर्षीप्रमाणे यंदाही उत्तरपत्रिकांच्या मूल्यांकनाचा प्रश्न निर्माण होणार आहे.
मुख्यमंत्र्यांना जाग, याचा आनंद -डॉ. रघुवंशी
मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी असहकार आंदोलन करणाऱ्या प्राध्यापकांवर कडक कारवाई करण्याचे सुतोवाच केले आहे, पण मुख्यमंत्र्यांच्या सांगण्यानुसार मागण्या मान्य झाल्यास आंदोलनाचा प्रश्नच उद्भवणार नाही. मुळात आंदोलनाच्या ७५ दिवसानंतर मुख्यमंत्र्यांना या विषयावर काही बोलावेसे वाटले, याचा आनंद आहे, अशी प्रतिक्रिया ‘नुटा’चे अध्यक्ष डॉ. प्रवीण रघुवंशी यांनी दिली. असहकार आंदोलनाच्या पहिल्या दिवसापासून संघटना जी भूमिका मांडत आहे, त्याला सुसंगत असे वक्तव्य मुख्यमंत्र्यांनी केले आहे, पण त्यासाठी एवढे दिवस उशीर का लागला, हाही एक प्रश्न आहे. मंत्रिमंडळ स्तरावर प्रस्ताव मांडला जाईल, असे सरकारतर्फे सांगण्यात येत आहे, पण निर्णय लेखी देण्याची सरकारची तयारी नाही. सरकारने सकारात्मक निर्णय घेतल्यासच आम्ही आंदोलन मागे घेण्याविषयी ठरवू, असे ते म्हणाले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व नागपूर वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Now evaluation going to struct
Show comments