आधी कर्जफेड, नंतर कर्ज.. राष्ट्रीयीकृत बँॅकांचे धोरण
जिल्हा बँक दिवाळखोरीत निघाल्याने गेल्या दोन वर्षांंपासून शेतकऱ्यांना राष्ट्रीयीकृत बॅंकेमार्फत पीक कर्जाचा पुरवठा करण्यात येत आहे. परंतु, गतवर्षी झालेल्या अत्यल्प पावसामुळे शेतकऱ्यांच्या उत्पादनात कमालीची घट येऊन जिल्ह्य़ावर दुष्काळाचे सावट पसरले होते. परंतु, याची तमा न बाळगता राष्ट्रीयीकृत बॅंकांनी आधी कर्जाची परतफेड करा, नंतर पीक कर्ज घ्या, असा फंडा सुरू करून दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक कोंडीत पकडत आहेत. विशेष म्हणजे, ३० जूनच्या आत कर्जाची परतफेड न केल्यास शेतकऱ्यांना बार टक्के व्याज दराने कर्ज घेऊन तीन टक्के व्याज सवलतीपासून वंचित राहावे लागणार आहे.
गतवर्षी जिल्ह्य़ात सरासरीपेक्षा कमी पाऊस झाल्यामुळे शेतकऱ्यांच्या उत्पादनात कमालीची घट झाली आहे. शिवाय, जिल्ह्य़ावर भीषण दुष्काळाचे सावट पसरले होते. चारा व पाणीटंचाईने हाहाकार उडवून दिला होता. दरम्यानच्या काळात महसूल प्रशासनाने सव्र्हे करून जिल्ह्य़ातील तब्बल ७०८ गावातील आणेवारी पन्नास पैशाच्या आत काढली होती. त्यामुळे या गावातील शेतकऱ्यांना दुष्काळाच्या सुविधा मिळतील, अशी अपेक्षा होती. परंतु, अद्याप शासनाने या गावातील शेतकऱ्यांची कर्जे माफी केली नाहीत. तशातच गेल्या दोन ते तीन वर्षांंपासून शेतकऱ्यांची जिव्हाळ्याची असलेली जिल्हा केंद्रीय सहकारी बॅंक डबघाईस आल्यामुळे शेतकरी अधिकच अडचणीत सापडला आहे.
गतवर्षीही शेतकऱ्यांनी पीक कर्ज घेऊन पेरणी केली होती. परंतु, अत्यल्प पावसामुळे शेतकऱ्यांचा उत्पादन खर्चही निघाला नाही. अशी परिस्थिती असतांनाही कर्जपुरवठा करणाऱ्या राष्ट्रीयीकृत बॅंकांनी आधी कर्जाची परतफेड करा, नंतर पीक कर्ज घ्या, असा नवीन फंडा सुरू करून दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी करण्यात येत आहे. शिवाय, जे शेतकरी ३० जूनच्या आत पीक कर्जाची परतफेड करतील, त्यांना डॉ.पंजाबराव देशमुख तीन टक्के व्याज सवलत योजनेचा लाभ मिळणार आहे. अन्यथा, ३० जूननंतर शेतकऱ्यांच्या पीक कर्जाचे तब्बल १२ टक्के व्याज दराने पुनर्गठन करण्यात येणार आहे. जिल्ह्य़ातील अनेक श्ेातकरी घरातील सामान विकून कर्जाची परतफेड करीत आहेत. परंतु, ज्यांच्याकडे कर्ज भरण्यासाठी पैसे नाहीत, त्यांनी काय करावे, असा प्रश्न शेतकरी उपस्थित करीत आहेत. परिणामी, अशा शेतकऱ्यांना व्याज सवलतीपासून वंचित राहावे लागणार आहे. शिवाय, त्यांना १२ टक्के व्याज दराने पीक कर्ज घ्यावे लागणार आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा