महापालिकेची विनामूल्यअत्यंविधी ही सेवाभावी योजना १ एप्रिलपासून सुरू झाली. यासाठीच्या व्यवस्थेसाठी अत्यंसस्कार सहायक मंडळाला अधिकार देण्यात आले असून मंडळाच्या वतीने अच्युत पिंगळे व विद्युतदाहिनीच्या वतीने मेहुल भंडारी काम पाहणार आहेत.
नगरसेवक संजय चोपडा यांनी सर्वसाधारण सभेत विनामुल्य अत्यंविधीचा विषय उपस्थित केला होता. त्यांना गणेश भोसले, दिलीप सातपुते, संभाजी कदम, बाळासाहेब बोराटे यांनी पाठिंबा दिला. महापौर शीला शिंदे यांनी या विषयाला संमती देत आयुक्तांबरोबर चर्चा केली व विषय अधिकृतपणे मंजूर करून घेतला. त्याचबरोबर महापौर विकास निधीतून यासाठी ५ लाख रूपयांच्या खर्चाची तरतुदही केली. नगरसेवकही त्यांच्या प्रभाग विकास निधीतून यासाठी मदत देऊ शकतील.
गणेश भोसले व चोपडा यांनी त्याप्रमाणे प्रत्येकी २ लाख रूपये या निधीत जमा करण्याबाबतचे पत्र प्रशासनाला दिले आहे. उपायुक्त डॉ. महेश डोईफोडे व प्रभारी आरोग्य अधिकारी डॉ. सतीश राजूरकर यांच्या मार्गदर्शनाखाली हे काम चालेल. अत्यंविधीसाठी लागणारे साहित्य (लाकूड, गोवऱ्या तसेच अन्य) यात अत्यंविधी सहाय मंडळाच्या माध्यमातून विनामुल्य दिले जाईल.
ज्यांना हे साहित्य विनामुल्य नको असले त्यांना तो खर्च देणगी स्वरुपात मनपाला देण्याची मुभा आहे. हा खर्च ते थेट मनपाच्या खात्यात ( विजया बँक, तेलीखुंट शाखा,) आयुक्त किंवा उपायुक्तांच्या नावे जमा करू शकतील. केडगाव येथील मोक्षधाम, नगरमधील अमरधाम मध्ये होणाऱ्या अत्यंसंस्कारासाठी हे साहित्य देण्यात येणार असून त्याच्या वाहतुकीची जबाबदारी मयताच्या नातेवाईकांची असेल.
मनपा पदाधिकाऱ्यांच्या या निर्णयामुळे नगर मनपाचा समावेशही अत्यंविधीचा खर्च विनामुल्य करणाऱ्या मनपांच्या यादीत झाला आहे. माजी नगरसेवक अनिल शिंदे, सोमनाथ कुऱ्हे, अशोक भंडारी यांचाही या निर्णयात सहभाग आहे. शहर हद्दीतील नागरिकांसाठी ही योजना असून मृताच्या नातेवाईकांनी त्याबाबत मनपाला सहकार्य करावे असे आवाहन महापौर श्रीमती शिंदे यांनी केले आहे.  
 

Story img Loader