इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठाच्या(इग्नू) दहावी व बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी व्होकेश्नल अभ्यासक्रम सुरू केले आहेत. इग्नूचे ४४ देशांमध्ये केंद्र आहेत. इग्नूच्यावतीने ४००च्यावर अभ्यासक्रम सुरू आहेत. त्यात प्रमाणपत्र, पदविका, पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमांचा समावेश आहे. त्या व्यतिरिक्त आता इग्नूने दहावी व बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी व्होकेश्नल अभ्यासक्रमही सुरू केले आहेत. त्याची प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यात आली असून जानेवारी २०१३साठी प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांनी येत्या ३० नोव्हेंबपर्यंत प्रवेश घेण्याचे आवाहन इग्नूचे प्रादेशिक संचालक डॉ. पी. शिवस्वरूप यांनी पत्रकार परिषदेत केले. त्यानंतर २०० रुपये विलंब शुल्कासह १५ डिसेंबपर्यंत विद्यार्थी प्रवेश घेऊ शकतील.
या व्यतिरिक्त पदव्युत्तर अभ्यासक्रमांमध्ये ग्रामीण विकास, मानसशास्त्र, शरीरशास्त्र, तत्त्वज्ञान, समाजकार्य, एमएस्सी (डायबिटिस) आणि फूड सव्‍‌र्हिस मॅनेजमेंट इत्यादींसोबत अनेक पदवी अभ्यासक्रमही सुरू करण्यात आले आहेत. या अभ्यासक्रमांना प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांनी १०० रुपये रोख किंवा १५० रुपयांचा डीडी पाठवण्याचे आवाहन इग्नूतर्फे करण्यात आले आहे. एमबीएच्या जुलै २०१३साठी प्रवेश परीक्षा येत्या ३ फेब्रुवारीला होऊ घातली आहे. प्रवेश परीक्षांचे अर्ज भरण्याची मुदत १५ डिसेंबर आहे. विद्यार्थ्यांसाठी त्यासंबंधीचे माहितीपुस्तक ५०० रुपयांना उपलब्ध आहे. एमबीए(बँकिंग आणि फायनान्स) हा अभ्यासक्रम सुरू करण्यात आला असून त्याला प्रवेश घेण्याची अंतिम मुदत १५ डिसेंबर आहे. त्याच्या माहितीपुस्तिकेची किंमत ५०० रुपये आहे.
याशिवाय अनेक ज्येष्ठ नागरिक किंवा मधुमेहींना वैद्यकीय मदतीसाठी नियमितपणे रुग्णालयात दाखल करावे लागते. त्यासंबंधीची मागणीही वाढली आहे. म्हणूनच इग्नूने सहा महिन्यांचा प्रमाणपत्र अभ्यासक्रम ‘घरातच आरोग्याची काळजी’ घेणारा अभ्यासक्रम दहावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी तयार केला आहे. या अभ्यासक्रमासाठीही श्रेयांक पद्धत अवलंबण्यात आली असून थेअरीसाठी ४ श्रेयांक तर प्रात्यक्षिकांसाठी १० श्रेयांक दिले जातील. या अभ्यासक्रमाचे शुल्क १५०० रुपये आहे. विद्यार्थ्यांना अभ्यासासाठीची पुस्तके आणि प्रात्यक्षिकही त्याच शुल्कातून मिळणार आहेत. हा अभ्यासक्रम पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांला रुग्णालयात कमितकमी ३००० रुपयांची नोकरी मिळवून देण्यासाठी इग्नू प्रयत्न करेल. याशिवाय बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी मधुमेहींची काळजी कशी घ्यावी यासंदर्भातील ‘डायबेटिक केअर फॉर कम्युनिटी वर्कर्स’ हा अभ्यासक्रम शिकवला जाणार आहे. अभ्यासक्रमासाठी दोन हजार रुपये शुल्क आकारण्यात आले असून त्यात पुस्तके आणि इतर साहित्य पुरवले जाईल. या अभ्यासक्रमात विद्यार्थ्यांला रक्तगट आणि लघवीची तपासणी करणे, पायांची काळजी, समुपदेशन, मधुमेहींची मलमपट्टी करणे शिकवले जाईल. इतर व्होकेशनल अभ्यासक्रमात पॅरालिगल प्रॅक्टिस आणि दुग्ध तंत्रज्ञान इत्यादी अभ्यासक्रमांचा समावेश आहे.

Story img Loader