चंद्रपुरात महिला ठार दीड महिन्यात बळीसंख्या ९
जंगलातील बिबटय़ाने आता थेट चंद्रपूर शहरात प्रवेश केला असून काल सोमवारी मध्यरात्री वेकोलिच्या महाकाली कॉलरी वसाहतीत एका अज्ञात मनोरुग्ण महिलेवर हल्ला केल्याने तिचा घटनास्थळीच मृत्यू झाला. या घटनेने गेल्या दीड महिन्यात वाघ व बिबटय़ाच्या हल्ल्यात मृत पावलेल्यांची संख्या नऊवर गेली आहे.
ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प व परिसरात वाघ व बिबटय़ाने अक्षरश: धुमाकूळ घातला आहे. बिबटय़ाचा जंगलातील धुमाकूळ आता थेट चंद्रपूर शहरात आलेला आहे. जुनोना व परिसरातील जंगलातून बिबटय़ाने महाकाली कॉलरीत प्रवेश करून धुमाकूळ घालणे सुरू केले आहे. काल सोमवारी मध्यरात्री बिबटय़ाने महाकाली कॉलरीत प्रवेश करून एका मनोरुग्ण महिलेवर हल्ला केला. यात तिचा घटनास्थळीच मृत्यू झाला. आज पहाटे परिसरातील लोकांना या महिलेचा मृतदेह दिसल्यावर त्यांनी याची माहिती वनाधिकारी व शहर पोलिसांना दिली. माहिती मिळताच चंद्रपूर वनखात्याचे उपवनसंरक्षक विनयकुमार ठाकरे, सहायक उपवनसंरक्षक कुळसंगे, वनपरिक्षेत्र अधिकारी शिंदे व शहर पोलीस ठाण्याचे अधिकारी दाखल झाले. ही मृत महिला अंदाजे ४० ते ४५ वयोगटातील असून सडपातळ आहे. या अज्ञात महिलेची ओळख अद्याप पटलेली नाही. महाकाली कॉलरी व परिसरातील लोकांकडे चौकशी करून या महिलेची ओळख पटविण्याचा प्रयत्न सुरू आहे. मात्र, सायंकाळपर्यंत तरी ओळख पटलेली नव्हती, अशी माहिती वनपरिक्षेत्र अधिकारी शिंदे यांनी लोकसत्ताशी बोलतांना दिली.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा