अन्यथा मुंबईशिवाय पर्याय नाहीच..
हापूसला युरोपियन महासंघाने दरवाजा बंद केल्याने निर्यातदारांनी युरोपमध्ये जाणारा सुमारे २५० टन हापूस आंबा आता आखाती देश आणि मुंबईत पाठविण्याचे ठरवले आहे. मात्र मुंबई आणि दुबईत नेमका किती आंबा खपेल याचा अंदाज येत नसल्याने घाईघाईने आंबा पाठवू नका, असा सबुरीचा सल्ला कोकणातील आंबा बागायतदारांना दिला जात आहे. परंतु कडक उन्हाळ्यामुळे हापूस आंबा लवकर तयार होऊ लागला असून तो मुंबईत पाठविण्याशिवाय दुसरा पर्यायही उरलेला नाही. परिणामी आंबा बागायतदारांच्या तोंडाला फेस आला आहे.
कोकणातील हापूस आंबा बागायतदारांवर या वर्षी अस्मानी आणि सुल्तानीही कोसळली आहे. निर्सगाच्या लहरीपणामुळे कधी ढगाळ वातावरण तर कधी चक्क पाऊस अथवा कडाक्याच्या थंडीमुळे पहिला मोहोर गळून पडला. त्यामुळे फेब्रुवारी-मार्चमध्ये हापूसला मिळणारा दोन ते तीन हजार रुपये प्रतिपेटीचा दर या वर्षी मिळाला नाही. दुसऱ्या फळधारणेचा आंबा आता मोठय़ा प्रमाणात बाजारात आला आहे. मात्र त्यांचा आकार छोटा आहे. त्यातच मागणी कमी आणि पुरवठा जास्त झाल्याने भाव गडगडण्याची वेळ आली आहे. एकदम सात लाख आंबा एका आठवडय़ात आल्याने तो ठेवायचा कुठे, असा प्रश्न व्यापाऱ्यांसमोर पडला आहे.
हे कमी म्हणून की काय युरोपियन महासंघाने १ मे पासून हापूस आंबा आणि पाच भाज्यांना युरोपमध्ये प्रवेशबंदी केली. हापूस आंब्यात फळमाशी आणि किटाणू असल्याचा आरोप युरोपियन महासंघाच्या वनस्पती आरोग्य स्थायी समितीने केला आहे. त्यामुळे युरोपमध्ये दररोज जाणाऱ्या साठ टन हापूस आंब्याला अचानक ब्रेक लागला आहे. या निर्यातीवर निर्यातदारांचे वार्षिक आराखडे अवलंबून असल्याने ते या वर्षी पूर्णपणे कोसळणार आहेत.  राज्यातील पन्नासएक निर्यातदारांना यामुळे ३०० कोटींचा फटका बसण्याची शक्यता निर्यातदार मोहन डोंगरे यांनी व्यक्त केली आहे. युरोपसारख्या मोठय़ा बाजारपेठेत (इंग्लडमध्ये दररोज २५ टन) आंबा जाणार नसल्याने निर्यातदारांनी कोकणातील चांगल्या प्रतीच्या आंब्याची आवक तूर्त थांबवली आहे. काही व्यापारी, निर्यातदार हे फळधारणा बघूनच संपूर्ण बागेचा भाव चुकता करतात. परंतु बंदीचा मोठा फटका या व्यापाऱ्यांना बसला आहे.
त्यातच उन्हाळाही चांगलाच वाढल्याने आंबा लवकर तयार होऊन पिकू लागला आहे. हा आंबा मुंबईत पाठविण्याशिवाय बागायतदारांकडे दुसरा पर्याय नाही. मुंबईत आलेला हापूस युरोपमध्ये पाठवता येत नसल्याने तो आता आखाती देशात, मुख्यत: दुबईत आणि मुंबईत पाठविण्याशिवाय निर्यातदारांना आता पर्याय नाही.

हापूसचा पाऊस..!
नवी मुंबईतील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात गेल्या तीन-चार दिवसांपासून कर्नाटक आणि कोकणातून हापूस आंब्यांच्या पेटय़ांचा अक्षरश: पाऊस पडतोय. शुक्रवारपासून दररोज लाखोंच्या संख्येने आंब्याच्या पेटय़ा बाजारात येत आहेत. दीड लाख पेटय़ांची आवक नोंदवून मंगळवारीही हा ओघ कायम राहिला.
    
खवय्यांची चंगळ
युरोपातील बंदीमुळे मुंबई-महाराष्ट्रातील खवय्यांची मात्र चंगल होणार आहे. युरोपमध्ये जाणारा अतिशय चांगल्या प्रतीचा हापूस या वर्षी देशात यंदा ५०० ते ८०० रुपये प्रतिडझन इतक्या कमी दरात मिळू शकणार आहे. यातील लहान फळ तर १०० रुपये प्रति डझनापर्यंत देण्याची तयारीही व्यापाऱ्यांनी केली आहे. कच्चा आंबा ५० रुपयांत घरी आणता येणार आहे. त्यामुळे आलेला हापूस संपवण्यासाठी त्याचे दर कमी केले जाणार आहेत. भारताबरोबर पाकिस्तानच्या हापूस आंब्यालाही बंदी घालण्यात आली आहे.

Story img Loader