देशातील सर्वाधिक ग्रामपंचायती या महाराष्ट्रात संगणकाद्वारे जोडल्या आहेत. याचाच फायदा खेडय़ा-पाडय़ातील बचतगटांना देण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या वतीने बचतगटांच्या वस्तूंचे मार्केटिंग इंटरनेटवर केले जाणार आहे. यासाठी एक पोर्टल बनविण्याचे काम अंतिम टप्प्यात आले असल्याची माहिती ग्रामविकासमंत्री जयंत पाटील यांनी दिली. तर येत्या काही दिवसांत तुम्ही माल उत्पादित करा त्याचे मार्केटिंग महाराष्ट्र शासन जगभर करेल, अशी ग्वाही मंत्री पाटील यांनी या वेळी दिली.     महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत कोल्हापूर जिल्ह्य़ातील स्वयंसहायता बचतगट जिल्हास्तरीय ताराराणी दीपावली महोत्सव उद्घाटन व राजमाता जिजाऊ स्वावलंबन पुरस्कार वितरण सोहळ्याप्रसंगी प्रायव्हेट हायस्कूलच्या मैदानावर मंत्री पाटील बोलत होते.     
पाटील म्हणाले, ग्रामीण भागातील दारिद्रय़ रेषेखालील बचतगट कुटुंबाचा आर्थिक स्तर उंचाविण्यासाठी या कुटुंबातील मुला-मुलींना स्वयं रोजगारीत बनविण्यासाठी प्रशिक्षण देण्यात येणार आहे. हे प्रशिक्षण त्यांच्या आयुष्याच्या रोजी-रोटीचा प्रश्न निकालात काढेल, असे मत त्यांनी व्यक्त केले. तर जिल्ह्य़ातील बचतगटांचे पुर्नमूल्यांकन करून दारिद्रय़ रेषेखालील कुटुंबांची यादी तयार करण्यात येणार असल्याचे सांगितले. देशाला प्रगतिपथावर न्यावयाचे असेल, तर दुर्बल व दुर्लक्षित महिलांना सक्षम बनविण्यासाठी बचतगटांनी त्यांचेमागे ठामपणे उभे राहून इतर महिलांना ही सक्षम बनवावे, असा सल्ला त्यांनी दिला.
कामगारमंत्री हसन मुश्रीफ म्हणाले, ज्या देशात महिला पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून प्रयत्न करतात तोच देश प्रगती करतो. यासाठीच भारताने निर्णय प्रक्रियेत महिलांना सामावून घेतले आहे. बचतगटांनी कायमस्वरूपी कामकाज मिळण्यासाठी त्यांच्या उत्पादनांना गर्दीच्या ठिकाणीच बाजारपेठ मिळाली पाहिजे. वयासाठी विशेष प्रयत्न करणे गजरेचे असल्याचे सांगितले. दारिद्रय़ रेषेवरील बचतगटांनाही थोडेफार अनुदान देण्यात यावे, अशी मागणी त्यांनी जयंत पाटील यांच्याकडे केली.     
या वेळी महापौर प्रतिभा नाईकनवरे, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संजय मंडलिक, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.विजय सूर्यवंशी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी आर.पी. शिवदास, शिक्षण सभापती महेश पाटील, जि.प.उपाध्यक्ष हिंदुराव चौगुले आदी उपस्थित होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा