दक्षिण मुंबईतील आर्थिक केंद्र असलेल्या कुलाब्यापासून अंधेरीतील व्यावसायिक केंद्र असलेल्या ‘सीप्झ’पर्यंत ३३ किलोमीटर लांबीच्या मुंबईतील पहिल्या भुयारी मेट्रो रेल्वेला केंद्रीय मंत्रिमंडळाने जूनअखेरीस मंजुरी दिल्यानंतर मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने हे आव्हान पार पाडण्यासाठी सज्जता सुरू केली आहे. भुयारी मार्गाची बांधणी, स्थानकांची बांधणी अशा या प्रकल्पातील अत्यंत महत्त्वाच्या कामांवर देखरेख ठेवण्यासाठी तज्ज्ञ सल्लागार नेमण्याची प्रक्रिया सुरू करत तिसऱ्या मेट्रोच्या कामाच्या दिशेने एक एक पाऊल पुढे टाकण्यास सुरुवात केली आहे. मुंबईला जागतिक वित्त केंद्र म्हणून विकसित करण्याच्या प्रयत्नांचा भाग म्हणून कुलाबा ते सीप्झ हा शहरातील तिसरा आणि भुयारी पद्धतीने बांधण्यात येणारा मुंबईतील पहिला मेट्रो रेल्वे मार्ग आखण्यात आला आहे. ही तिसरी भुयारी मेट्रो रेल्वे कुलाबा-नरिमन पॉइंट, वांद्रा-कुर्ला संकुल, अंधेरी औद्योगिक वसाहत आणि सीप्झ या व्यावसायिक केंद्रांना एकमेकांशी जोडेल. तसेच देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय विमानतळही या मेट्रोच्या मार्गावर असणार आहेत. या मेट्रो रेल्वेला आठ डबे असतील आणि दर तीन मिनिटांना एक गाडी सुटेल, असे नियोजन आहे. या प्रकल्पासाठी सुमारे २४,४३० कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. त्यासाठी वित्तपुरवठा करण्याबाबत ‘जापनिज इंटरनॅशनल  कोऑपरेशन एजन्सी’ अर्थात ‘जायका’ने सहमती दर्शवली आहे. प्रकल्प खर्चाच्या २४ हजार कोटी रुपयांपैकी चार हजार कोटी रुपये ‘एमएमआरडीए’ तर चार हजार कोटी रुपये केंद्र सरकार भागभांडवल म्हणून गुंतवतील. मुंबई विमानतळ चालवणाऱ्यांकडून ७५० कोटी रुपये घेण्यात येतील. तर ‘जायका’कडून साडे बारा हजार कोटी रुपयांचे कर्ज मिळेल अशी ढोबळ आर्थिक रचना आहे.या मेट्रोसाठी ३३ किलोमीटरचा भुयारी मार्ग बांधावा लागणार आहे. त्याचबरोबर मेट्रोची स्थानके आणि इतर सारी यंत्रणाही जमिनीखाली खोलवर उभी करावी लागणार आहे. मुंबईत आजवर अशारितीचे काम झालेले नाही. त्यामुळे ते एक मोठे आव्हान आहे. हे आव्हान यशस्वीपणे पेलण्यासाठी विशेषज्ञांची गरज लागणार आहे. त्यामुळे केंद्र सरकारकडून प्रकल्पाला हिरवा कंदील मिळताच प्राधिकरणाने तज्ज्ञांच्या भरतीचे काम सुरू केले आहे.