ऊस उत्पादकांचे आंदोलन अधिक तीव्र करण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने जिल्ह्य़ात पुढाकार घेतला असून स्वाभिमानी शेतकरी संघटना व शेतकरी संघटना (रघुनाथदादा गट) यांना एकत्र घेऊन सोमवारपासून (दि. १९) जिल्ह्य़ातील सर्व कारखान्यांचे गाळप थांबवण्याचा इशारा नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष अभय साळुंके यांनी पत्रकार परिषदेत दिला.
स्वाभिमानी संघटनेचे सत्तार पटेल, राजेंद्र मोरे, रघुनाथदादा शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष राजकुमार सस्तापुरे, मनसेचे संतोष नागरगोजे उपस्थित होते. साळुंके म्हणाले की, ऊसउत्पादक आंदोलन राज्यभर पेटूनही व त्यात दोन शेतकऱ्यांचा बळी जाऊनही आंदोलनासंबंधी तोडगा निघत नाही. एकीकडे सरकार कारखानदार व ऊस उत्पादकांनी आपसांत तडजोड करून भाव ठरवावा, सरकार मध्यस्थी करणार नाही, अशी भूमिका घेते तर दुसरीकडे केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार आंदोलकांची जात काढतात. सत्ताधारी मंडळींच्या बोटचेपे भूमिकेसंबंधी शेतकरी वर्गात संतप्त प्रतिक्रिया उमटत आहे. राज्य सरकार ऊस उत्पादकांकडून विविध मार्गाने जो कर घेते ते घेणे थांबवावे. रंगराजन समितीची तातडीने अंमलबजावणी करावी व साखर उद्योग करमुक्त करावा. या वर्षी सरकारने उसासाठीचा हमीभाव जाहीर करावा या प्रमुख मागण्या आहेत.
जिल्ह्य़ातील साखर कारखान्यांनी सोमवारपासून (दि. १९) गाळप बंद करावे. दोन दिवसांत शेतात तोडलेला ऊस व कारखाना कार्यक्षेत्रावर असलेला ऊस गाळप करून संपवावा. त्यानंतर शेतकऱ्यांचे बेमुदत आंदोलन उसाला योग्य भाव मिळेपर्यंत चालू राहणार आहे. ऊसतोड कामगार, वाहतूक कंत्राटदार व कारखान्यांनी यात सहकार्य करावे. शेतकऱ्यांची लूट थांबवण्यासाठी सुरू होणाऱ्या या आंदोलनातून होणारे नुकसान टाळण्यासाठी जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षकांनी पूर्वतयारी करावी व कारखान्यांना सूचना द्याव्यात. आंदोलनात होणाऱ्या नुकसानीस आम्ही जबाबदार राहणार नाही, असा इशाराही देण्यात आला आहे.
शेतकरी संघटनेबरोबर मनसैनिक रस्त्यावर उतरणार असल्यामुळे आता तरुणांची साथ आंदोलनाला मिळणार आहे. त्यामुळे सोमवारपासून जिल्हाभरात हे आंदोलन अधिक तीव्र होण्याची शक्यता वाढली आहे.      

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
मराठीतील सर्व मराठवाडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Now mns also joined sugercane prise andolan