सांगलीच्या महानगरपालिका निवडणुकीत राष्ट्रवादीकडून काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी व मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्याविरुद्ध जी जहरी टीका करण्यात आली त्याबाबत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व सामाजिक न्यायमंत्री शिवाजारीव मोघे यांनी तीव्र निषेध नोंदविला व आता यापुढे राष्ट्रवादीसोबत निवडणूक युती संदर्भात पक्षाने विचार करावा, असे स्पष्ट विचार काँग्रेसच्या जिल्हास्तरीय वचनपूर्ती मेळाव्यात बोलताना व्यक्त केले.
शनिवारी आर्णी येथील तिर्थरूप मंगल कार्यालयात काँग्रेसच्या जिल्हास्तरीय वचनपूर्ती मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. अध्यक्षस्थानी शिवाजारीव मोघे होते. मेळाव्याला मोठय़ा संख्येने कार्यकर्त्यांनी हजेरी लावली होती. या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून विधानसभेचे उपाध्यक्ष प्रा. वसंतराव पुरके, जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष आमदार वामनराव कासावार, जिल्हा महिला काँग्रेसच्या अध्यक्ष विजयाताई धोटे, आमदार विजय खडसे, अ‍ॅड. सचिन नाईक, माजी मंत्री संजय देशमुख, डॉ. वजाहत मिर्झा, प्रताप राठोड, सीमा तेलंग, अशोक बोबडे, बाळासाहेब मांगुळकर, अरुण राऊत प्रामुख्याने उपस्थित होते.
काँग्रेसने स्वतंत्र निवडणूक लढविल्याने नगरपालिका, महानगरपालिका, जिल्हा परिषद निवडणुकीत बऱ्यापैकी यश मिळाले आहे. आम्ही राकाँ नेत्यावर कधीही टीका करीत नाही. मात्र, ते नेहमी खालच्या दर्जाची टीका आमच्या नेत्यांवर करतात ते कितपत सहन करायचे. त्यामुळे एकवेळ होऊन जाऊ द्याच, असे आपल्या आवेशपूर्ण भाषणातून त्यांनी सांगताच कार्यकर्त्यांनी टाळ्या वाजवून त्यांना पाठिंबा दर्शविला. काँग्रेसचा इतिहास फार मोठा असून या पक्षाच्या नेत्या इंदिरा गांधी, राजीव गांधींचा त्याग आहे. या त्यागातून काँग्रेसचे अस्तित्व अबाधित असल्याचे सांगत मोघे यांनी मोदी यांनी केलेल्या विधानाचाही खरपूस समाचार घेतला. केवळ प्रसिद्धीच्या क्षेत्रात असणारा हा नेता भाजपची नौका सर करण्यास कदापी यशस्वी होणार नाही. त्यांचे पंतप्रधानपदाचे स्वप्न कधीही पूर्ण होणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. प्रास्ताविक आमदार वामनराव कासावार त्यांनी केले.
प्रा. वसंत पुरके यांनी काँग्रेसच्या कार्याचे महत्व विषद केले. तसेच धोरण राबविताना शेतकऱ्यांवर अन्याय होणार नाही, याची काळजी आपल्याला घ्यावी लागेल. शेरोशायरीने प्रा. पुरके यांनी कार्यकर्त्यांमध्ये उत्साह निर्माण केला व हास्याचे फवारे उडाले. याप्रसंगी माजी मंत्री संजय देशमुख, डॉ. वजाहत मिर्झा, विजयाताई धोटे, डॉ. मोहम्मद नदीम, सीमा तेलंग, प्रताप राठोड, आमदार विजय खडसे, अ‍ॅड. सचिन नाईक आदींनी या वचनपूर्ती मेळाव्यात कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले.
या मेळाव्यात तालुकास्तरावर जमा करण्यात आलेला उत्तराखंड निधी जिल्हाध्यक्ष वामनराव कासावार यांच्याकडे देण्यात आला. बोधगयातील घटनेबद्दल मेळाव्यात तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला व सर्वप्रथम उत्तराखंडमधील घटनेबाबत श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. तसेच मोदी यांच्या वक्तत्वाबद्दल निषेधही नोंदविण्यात आला. जिल्हास्तरीय काँग्रेसच्या वचनपूर्ती मेळाव्याला मोठय़ा संख्येने कार्यकर्त्यांनी हजेरी लावली होती.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अशोक बोबडे व आरीज बेग यांनी केले. वसंतराव नाईक जन्मशताब्दी वर्षांनिमित्य १०० कोटीचा निधी, तसेच परभणी व मराठवाडा कृषी विद्यापीठाला वसंतराव नाईकांचे नाव दिल्याबाबत त्याचप्रमाणे यवतमाळ येथे कृषी विद्यालयाला वसंतराव नाईकांचे नाव देऊन सुरू करण्यात येणार असल्याची माहिती या मेळाव्यातून देण्यात आली.

Story img Loader