मुंबईतील प्रत्येक शाळा आणि महाविद्यालयात आता ‘पोलीस अंकल’ येणार आहेत. विद्यार्थ्यांच्या समस्यांच्या निराकरणासाठी वाहतूक पोलिसांनी ‘एक शाळा, एक पोलीस’ ही अभिनव योजना आखली आहे. एकूण ६८३ शाळा आणि १४७ महाविद्यालयात पोलीस अधिकारी आणि कर्मचारी तैनात असणार आहे.
शाळा आणि महाविद्यालयांच्या परिसरात मुलींची छेडछाड, सोनसाखळी चोरी, वाहन चोरी, वेगाने धावणारी वाहने आदी समस्या भेडसावतात. शाळा महाविद्यालये सुटल्यावर वाहतूक कोंडी होते. विद्यार्थ्यांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. या सर्व प्रकारांना आळा बसावा यासाठी मुंबई वाहतूक पोलिसांनी ही अभिनव योजना सुरू केल्याचे पोलीस उपायुक्त प्रताप दिघावकर यांनी सांगितले.
या योजनेनुसार प्रत्येक शाळेत एका पोलीस कर्मचाऱ्यावर आणि महाविद्यालयात एका पोलीस अधिकाऱ्यावर विद्यार्थ्यांच्या समस्या निवारण्याची जबाबदारी देण्यात येईल. त्यांचे मोबाईल क्रमांक शाळा आणि महाविद्यालयाच्या दर्शनी भागात उपलब्ध करण्यात येतील. ते नियमित भेटी देऊन काही अडचणी आहेत का ते समजावून घेतील. यामुळे वाहतुकीच्या समस्येबरोबरच छेडछाड, मारामारी आदी प्रकारांनाही आळा बसेल असे दिघावकर यांनी सांगितले.
शाळा आणि महाविद्यालयांच्या बाहेर तरुण मुले भरधाव वेगाने मोटारसायकली चालवून मुलींची छेड काढत असतात. या योजनेमुळे त्यालाही आळा बसू शकेल. शाळा आणि महाविद्यालयाबाहेर घुटमळणाऱ्या ‘रोड रोमियों’नाही चपराक बसणार आहे. मुंबईत पूर्व, पश्चिम आणि उत्तर विभागात एकूण ६८३ शाळा आणि १८३ महाविद्यालये आहेत. त्या प्रत्येकांमध्ये पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे. शाळेतील बसचालक, क्लिनर यांची सर्व माहिती या पोलिसांकडे असेल आणि त्यावर ते लक्ष ठेवतील. या पोलिसांना प्रत्येक महिन्याच्या सुरुवातीला आपला अहवाल वरिष्ठांकडे सादर करावा लागणार आहे. जे पोलीस चांगले काम करतील त्यांना बक्षिस देऊन गौरविण्यात येणार आहे. हे ‘पोलीस अंकल’ विद्यार्थ्यांचे मित्र असतील आणि विद्यार्थ्यांच्या प्रत्येक अडचणी सोडविण्यासाठी ते तत्पर राहतील, असेही दिघावकर म्हणाले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा