महात्मा गांधी जयंतीचे निमित्त साधून प्लॅस्टिक मुक्त पाचगणीच्या मोहिमेत नागरिक सुमारे ९०० स्वयंसेवकांनी सहभागी होत पाचगणीला प्लॅस्टिकमुक्त केले.
पाचगणी हे आशिया खंडातील सर्वात मोठय़ा पठाराचे पर्यटन केंद्र म्हणून ओळखले जाणारे शहर आहे. दररोज येथे हजारो पर्यटक निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी येत असतात.
तसेच आशिया खंडातील सर्वोत्कृष्ट शैक्षणिक केंद्र म्हणूनही या शहराची ओळख आहे. दररोज येणारे हजारो पर्यटक पाणी, थंड पेय पिण्यासाठी, कोणतीही वस्तू तेथेच विकत घेऊन खाताना आणि घरून येताना जास्तीत जास्त प्लॅस्टिकचाच वापर करत असतात. आणि ती वस्तू वापरल्यावर तेथेच टाकून देतात. पर्यटकांच्या अशा प्लॅस्टिक वापरामुळे पाचगणीच्या रस्त्यांच्या दुतर्फा गटारांत, झाडाझुडपांत प्लॅस्टिकच्या बाटल्या फूडपॅकचे रॅपर, गुटख्यांची, सुगंधी सुपारीची पाकिटे, प्लॅस्टिकच्या पिशव्यांचे अनेक ठिकाणी ढीग लागले होते. मोकळय़ा भागात व इतरत्र प्लॅस्टिक पसरले होते. अनेकदा दैनंदिन साफसफाईतही पावसाळी वातावरणामुळे हे साफ करताना अडचणी येत होत्या. पावसाने थोडीशी उसंत देताच नगराध्यक्ष लक्ष्मी कऱ्हाडकर यांनी पाचगणीत स्वच्छता मोहीम राबविण्याचे व प्लॅस्टिकमुक्त शहर करण्याचे आवाहन केले. त्याला प्रतिसाद देत शिवाजी चौकात सकाळी स्वत: नगराध्यक्ष लक्ष्मी कऱ्हाडकर, उपाध्यक्ष संतोष शिंदे, मुख्याधिकारी विद्या पोळ, नगरसेवक प्रवीण बोधे, दिलावर बागवान, दिलीप बगाडे आदींसह सर्व नगरसेवक, २७ शिक्षण संस्थांचे विद्यार्थी, नागरिक, पालिका कर्मचारी आदींसह स्वयंसेवकांनी छत्रपती शिवाजीमहाराज व डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळय़ास पुष्पहार अर्पण करून पाचगणीच्या स्वच्छता सामूहिक मोहिमेत भाग घेतला.
या मोहिमेत विद्यार्थ्यांचे नगरसेवक व नागरिकांचे गट तयार करण्यात आले. त्यामध्ये त्या गटाला स्वत:ची शाळा व परिसर स्वच्छ करण्याचे काम देण्यात आले. या मागे कोणताही राजकारणाचा लवलेश नव्हता.
प्रत्येक गटासह स्वच्छतेचा मंत्र घेत मोहिमेतील सर्वाचे हात सरसावू लागले. काही तासांच्या अथक प्रयत्नानंतर पालिकेचे सर्व रस्त्यांसह पर्यटनस्थळ चकाचक झाल्याचे समाधान या कामात सहभागी झालेल्यांच्या चेहऱ्यावर दिसत होते. नगराध्यक्ष लक्ष्मी कऱ्हाडकर म्हणाल्या, पाचगणी स्वच्छ करण्याच्या संकल्पनेला सर्वानीच चांगला पाठिंबा दिला. या पुढेही शहर स्वच्छ ठेवण्यासाठी प्रयत्न आणि जास्तीत जास्त पर्यटकांना आकर्षति करू या.