शिवसेनेच्या दसऱ्या मेळाव्यात माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांच्या झालेल्या अपमाननाटय़ाच्या राजकीय घडामोडींवर गुरुवारी उद्योगमंत्री नारायण राणे यांना ‘मनोहर जोशी यांच्याशी दूरध्वनीवरून बोलणे झाले का’ असा सहज प्रश्न केला गेला आणि राणे म्हणाले, ‘त्यांनी आता गप्प राहून आराम केलेले चांगले. आपला टाइमबार झाला आहे, हे त्यांनी ओळखायला हवे,’ असेही ते म्हणाले.
मराठा आरक्षण समितीच्या बैठकीसाठी औरंगाबाद येथे आलेले राणे बैठकीनंतर पत्रकारांशी बोलत होते. शिवसेना आणि मनसेमध्ये लहान-सहान संघटनात्मक बाबींवरही राणे प्रतिक्रिया व्यक्त करतात. ‘सरां’वर बोलताना त्यांनी सल्लाच दिला, ‘त्यांनी आता आराम करावा.’ हा तुमचा सल्ला काय, असे विचारल्यावर मी त्यांच्यापेक्षा लहान आहे, असे ते सांगायला विसरले नाहीत. मनोहर जोशी यांना काँग्रेसमध्ये येण्याचे निमंत्रण देणार आहात का, असे विचारले गेले आणि पुन्हा राणे जोशींवर घसरले. उद्धव ठाकरे ज्यांना भेट देत नाहीत, त्यांनी समजून जावे, आपला टाइमबार झाला आहे. काँग्रेसमध्ये उपयोगी माणसांनाच घेतले जाते.
राणे जसे मनोहर जोशींवर बोलले, तसेच ते शालेय शिक्षणमंत्री राजेंद्र दर्डा यांच्याविषयीही बोलले. औद्योगिक क्षेत्रातील बहुतांशी गोष्टी केल्याचा दावा वर्तमानपत्रातून दर्डा करीत आहेत याकडे लक्ष वेधले असता राणे तिरकसपणे म्हणाले की, तेही आमच्या मंत्रिमंडळातच आहेत. उद्योगाचा त्यांनी विकासच केला असेल. आपापल्या खात्यात प्रत्येकाने लक्ष घालायला हवे, असेही त्यांनी आवर्जून नमूद केले. केवळ मनोहर जोशी आणि दर्डा यांच्यावरच ते बोलले, असे नाही. तर ‘सरकार पळते की चालते’, यावरही राणे यांनी भाष्य केले. पण प्रश्नाचे उत्तर ‘नो कॉमेंट’मध्ये दडले आहे, असेही ते म्हणाले.
बुधवारी पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमात भूषण गगराणी आणि श्रद्धा बेलसरे हे दोन्ही अधिकारी चांगले होते, असे सांगताना माझ्या काळात चांगले अधिकारी भेटले. त्यामुळे माझे सरकार पळत होते, असे मी म्हणालो होतो. सध्याचे सरकार चालते आणि माझे पळत होते, असे सांगण्यामागे मुख्यमंत्र्यांवर नाराजी आहे का, असा थेट प्रश्न विचारला असता राणे उत्तरले, ‘सरकार चालते की पळते या विषयी ‘नो कॉमेंट’, तर मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण या व्यक्तीवर नाराजी नाही.’

Story img Loader