‘युनिक फिचर्स’तर्फे आयोजित तिसरे ई-मराठी साहित्य संमेलन येत्या २० मार्च रोजी मुंबईत होणार असून या संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ साहित्यिक डॉ. भालचंद्र नेमाडे यांची निवड करण्यात आली आहे. विशेष म्हणजे तीन दिवसांचे हे साहित्य संमेलन http://www.uniquefeatures.in  या संकेतस्थळावर साहित्य रसिकांसाठी खुले राहणार आहे. संमेलनाचे उद्घाटन मुंबई मराठी पत्रकार संघाच्या सभागृहात होणार आहे.
दोन वर्षांपूर्वी युनिक फिचर्सतर्फे पहिले ई-मराठी साहित्य संमेलन आयोजित करण्यात आले होते. या निमित्ताने जगातील सर्व मराठी मंडळी आणि साहित्यप्रेमी रसिक एकत्र आले. ज्येष्ठ साहित्यिक आणि नाटककार रत्नाकर मतकरी हे या संमेलनाचे अध्यक्ष होते. दुसरे ई-मराठी साहित्य संमेलन कवी ग्रेस यांच्या अध्यक्षतेखाली झाले. या दोन्ही साहित्य संमेलनांना भारताततूनच नव्हे तर अमेरिका, इंग्लंड, नायजेरिया, जर्मनी, हाँगकाँग, सौदी अरेबिया, जपान, इजिप्त, चीन आदी देशांमधूनही जोरदार हिट्स मिळाल्या होत्या, असे युनिक फिचर्सचे व्यवस्थापकीय संचालक आनंद अवधानी आणि संपादक-संचालक सुहास कुलकर्णी यांनी सांगितले.
दृक-श्राव्य स्वरूपात विविध मान्यवरांची उपस्थिती या संमेलनास असणार आहे. साहित्यप्रेमी मंडळींना घरबसल्याही या संमेलनाचा आनंद घेता येणार आहे. युनिक फिचर्सने या ई-मराठी साहित्य संमेलनाच्या निमित्ताने दहा दिवंगत साहित्यिकांचे वेब डॉक्युमेंटेशन केले असून ते मराठी आणि इंग्रजी अशा दोन्ही भाषांमध्ये उपलब्ध असेल. हा उपक्रम केवळ या संमेलनापुरता राहणार नसून नंतरही मराठी साहित्यिकांना माहितीच्या महाजालात आणण्याचे काम सुरूच राहणार असल्याचे अवधानी आणि कुलकर्णी यांनी सांगितले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा