राज्यातील जमिनींचे सात-बारा, फेरफार व सर्व कागदपत्रे लवकरच मोबाइलवर उपलब्ध करून देण्यात येईल, अशी माहिती महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी केली. तसेच खंडकरी शेतक-यांना जमीन वाटप करताना नवीन शर्तीची अट काढून टाकण्याचा प्रस्ताव मंत्रिमंडळापुढे ठेवण्यात येईल, असे स्पष्ट केले.
शेती महामंडळाच्या हरेगाव मळ्यावरील शेतक-यांना सात-बाराच्या वाटपप्रसंगी थोरात बोलत होते. खंडकरी चळवळीचे नेते कॉ. माधवराव गायकवाड, आमदार भाऊसाहेब कांबळे, आमदार डॉ. सुधीर तांबे, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष जयंत ससाणे, शेती महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक अग्रवाल, उपसचिव खाडे, उपजिल्हाधिकारी रिवद्र जगताप, प्रांताधिकारी सुहास मापारी आदी या वेळी उपस्थित होते.
थोरात म्हणाले, राज्यात सातबारा तसेच जमीनविषयक कागदपत्रांचे संगणकीकरण करण्यात आले आहे. आता ते मोबाइलवर उपलब्ध करून दिले जाईल. विविध बँका तसेच सरकारी कार्यालये यांना ही कागदपत्रे त्यांचे संगणक  व मोबाइलवर पाहावयास मिळतील. त्यासाठी आता कागदी सात-बारा त्यांना द्यावा लागणार नाही. तसेच राज्य सरकारने विद्यार्थ्यांना लागणारे दाखले शाळेतच देण्यास प्रारंभ केला आहे. आतापर्यंत ४२ लाख दाखले देण्यात आले असून आणखी ८० लाख दाखले दिले जाणार आहे. त्याची नोंद लिम्का बुकमध्ये करण्यात आली आहे. महसूल खात्याने हा एक विक्रम केला आहे.
खंडकरी शेतक-यांना जमीनवाटप सुरू असून वर्ग दोनचे रूपांतर वर्ग एकमध्ये करून नवीन शर्तीची अट काढून टाकली जाईल. जमिनीवर पूर्णपणे त्यांची मालकी राहील. तसेच एक एकरापेक्षा कमी क्षेत्र असलेल्या शेतक-यांना जमीनवाटप केले जाईल. त्यासाठी कमी पडणारे क्षेत्र देऊ. महामंडळाच्या दहा ते वीस गुंठे जमीन असेल तर ती सरकारी किमतीत लिलाव पद्धतीने त्या शेतक-यांना सलग करून दिली जाईल. निंबाळकर समितीच्या अहवालामुळे शहरालगतच्या बिगरशेतीलायक जमिनी राखून ठेवण्यात आल्या. पण त्यातून मार्ग काढण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे ते म्हणाले.
शेती महामंडळाची जमीन वाटप करताना रस्ते व चा-याचे क्षेत्र वगळावे, तसेच जलसंधारणाचे क्षेत्रही राखून ठेवून त्यात कामे करावीत. असा प्रयत्न असून लवकरच मंजुरी दिली जाईल. अकारी पडीक जमीन शेतक-यांना परत करण्यासाठी मसुदा तयार करण्यात येऊन तो मंत्रिमंडळापुढे मांडला जाईल. मी महसूलमंत्री असेपर्यंत हे काम पूर्ण केले जाईल, अशी घोषणा थोरात यांनी केली.
आमदार कांबळे व ससाणे यांच्यासह आमदार तांबे, अग्रवाल, जगताप, मापारी, गायकवाड, खंडकरी नेते अण्णासाहेब थोरात, बी. डी. पाटील, सचिन गुजर, तहसीलदार किशोर कदम आदींची भाषणे झाली. सूत्रसंचालन महेश सोनार यांनी केले.

Story img Loader