जगात अमेरिका, जपान, इंग्लड, चीन, फ्रान्स आणि दुबईसारख्या प्रगत देशांतील उंचच उंच इमारती आणि हॉटेल्स बांधण्यासाठी वापरण्यात येणारे बिल्डिंग इन्फॉर्मेशन मॉडलिगंचे तंत्रज्ञान सिडको खारघर येथे बांधण्यात येणाऱ्या अत्यल्प उत्पन्न गटातील घरांच्या इमारतींसाठीही वापरणार आहे. या तंत्रज्ञानामुळे इमारतीच्या खांबांचे थ्रीडी नकाशे काढून ठेवले जाणार असून बांधकाम करताना तर या नकाशांचा उपयोग होईलच, शिवाय भविष्यात या इमारतींची डागडुजी करण्याची वेळ आली तर त्या खांबांची संपूर्ण कुंडली या थ्रीडी तंत्रज्ञानाने अभियंत्यांकडे उपलब्ध राहणार आहे.
सिडकोच्या मोडकळीस आलेल्या इमारतींचा प्रश्न अलीकडे मोठय़ा प्रमाणात चर्चिला जात आहे. केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांनीही या बांधकामांवर टीका केली. त्यामुळे या इमारती पुनर्बाधणीच्या नावाने वाढीव एफएसआयही मागितला जात आहे. सिडकोच्या बांधकामावर अशी सर्व बाजूने टीका होत असताना भविष्यात बांधकामाची गुणवत्ता कायम राहावी यासाठी सिडकोच्या अभियंत्यांनी नवनवीन तंत्रज्ञान आत्मसात करण्याचे ठरविले आहे. परदेशात प्रचलित असणारे हे तंत्रज्ञान सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक तानाजी सत्रे यांनी खारघर येथील घरकुल प्रकल्पात वापरण्यास परवानगी दिली असून नवी मुंबईत ते सर्वप्रथम वापरले जाणार आहे. खारघर येथील सेक्टर ३६ येथे सिडको सध्या साडेचार हजार घरांचा प्रकल्प राबवित असून या भागात दहा हजार घरे उभारण्याचे उद्दिष्ट आहे. यातील अत्यल्प व अल्प गटासाठी साडेतीन हजार घरे बांधण्यास सिडको संचालक मंडळाने नुकतीच मंजुरी दिली आहे. त्यामुळे या बांधकामास लवकरच सुरुवात होणार असून बी. जी. शिर्के कंपनीला हे काम देण्यात आले आहे. सात आणि १४ मजल्यांच्या ५४ इमारतींमध्ये ‘फायबर टू द होम’द्वारे सीसी टीव्ही, केबल, डाटा केबल मिळणार आहे. याशिवाय सिंगल बिल पॉइन्ट सुविधा या इमारतीत राहणार असल्याने विविध बिल भरण्यासाठी घराबाहेर पडावे लागणार नाही. या प्रचलित सुविधांबरोबरच सिडकोने या इमारतींची सर्व कुंडली एका थ्रीडी सीडीवर उतरविण्याची तयारी सुरू केली आहे. त्याला बिल्डिंग इन्फॉर्मेशन मॉडलिंग असे म्हटले जाते. या तंत्रज्ञानाने इमारतीच्या खांबांमध्ये किती सिमेंट, सळई, विटा आणि इतर बांधकाम साहित्य आहे याची माहिती मिळणार आहे. त्याचप्रमाणे या खांबांमधून किंवा त्याच्या जवळून कोणत्या वाहिन्या गेल्या आहेत, याची माहिती उपलब्ध होणार आहे. एकप्रकारे ही त्या इमारतीची सोनोग्राफी मानली जात आहे. या तंत्रज्ञानामुळे कामाचे समन्वय तर होणार आहेच याशिवाय वेळ, मानवी श्रम आणि खर्च वाचणार असल्याचे सिडकोचे मुख्य अभियंता केशव वरखेडकर यांनी सांगितले.

Story img Loader