सोलापूर शहरातील अनधिकृत आणि ‘नो डिजिटल झोन’मध्ये उन्मत्तपणे मोठय़ा प्रमाणात उभारण्यात आलेले डिजिटल फलक हटविण्याची मोहीम महापालिकेचे नूतन आयुक्त चंद्रकांत गुडेवार यांनी हाती घेताच ९० टक्के डिजिटल फलक संबंधितांनी स्वत:हून काढून टाकले.मंगळवारी सकाळी ठरल्याप्रमाणे कारवाईची मोहीम मोठय़ा धडाक्यात सुरू होऊन उरलेले डिजिटल फलक जप्त करून संबंधितांवर फौजदारी कारवाईचा बडगा उगारण्यात आला. या कारवाईमुळे काही तासांतच अवघे सोलापूर शहर ‘डिजिटल फलक मुक्त’ झाल्याचे सुखद चित्र पाहावयास मिळाले.
शहरात डिजिटल फलकांची गर्दी प्रचंड प्रमाणात वाढली होती. कोणीही उठावे आणि डिजिटल फलक लावावे असे सार्वत्रिक चित्र होते. यात पालिका प्रशासन व पोलिसांच्या दुर्लक्षामुळे कायद्याची ‘ऐशी तशी’ झाली होती. विशेषत: या प्रश्नावर पालिका प्रशासन व पोलीस केवळ कागदोपत्री आचारसंहिता जारी करून प्रत्यक्ष कायद्याची अंमलबजावणी करीत नव्हते. या पाश्र्वभूमीवर पालिकेचे नूतन आयुक्त चंद्रकांत गुडेवार यांनी थोडय़ाच दिवसांत डिजिटल फलकांकडे मोर्चा वळविला. दहा दिवसांपूर्वी आयुक्त गुडेवार यांनी शहरात सर्वत्र उभारण्यात आलेले विनापरवाना डिजिटल फलक तातडीने काढून टाकण्याचे आदेश दिले होते. शहरात नऊ ठिकाणी असलेल्या ‘नो डिजिटल झोन’मध्ये एकही डिजिटल फलक दिसता कामा नये, अशा त्यांच्या सक्त सूचना होत्या. त्यासाठी त्यांनी १ ऑक्टोबरपासून कठोर कारवाई करण्याचा इशाराही दिला होता. आयुक्त गुडेवार यांच्या कार्यशैलीची चांगलीच जाणीव झाल्यामुळे बहुसंख्य डिजिटल फलक संबंधितांनी कारवाईची मोहीम सुरू होण्यापूर्वीच परस्पर काढून घेण्यात शहाणपणा दाखविला. यात ९० टक्के डिजिटल फलक परस्पर हटविले गेल्याने आयुक्त गुडेवार यांच्या कायद्याच्या अंमलबजावणीचा धाक सर्वत्र दिसून आला.
या पाश्र्वभूमीवर मंगळवारी ठरल्याप्रमाणे सकाळपासून पालिका प्रशासन व पोलिसांनी उरलेल्या बेकायदा डिजिटल फलकांविरुद्ध कारवाईची मोहीम धडाक्यात सुरू केली. पांजरापोळ चौकातील छत्रपती शिवाजीमहाराज पुतळा व एस.टी. बसस्थानक परिसरात काही संस्था-संघटनांनी लावलेले डिजिटल फलक तसेच होते. कारवाईत हे फलक जप्त करण्यात आले. या वेळी मोठय़ा प्रमाणात पोलीस बंदोबस्त होता. कारवाईच्या वेळी कोणीही हस्तक्षेप केला नाही. ‘नो डिजिटल झोन’ भागात ही मोहीम विशेषत्वाने हाती घेण्यात आली आहे. डिजिटल फलकांवर ज्यांच्या छबी आणि नावे आहेत, त्या सर्वावर सार्वजनिक विद्रूपीकरण प्रतिबंधक कायद्यान्वये फौजदारी खटले दाखल करण्यात येणार आहेत. या कारवाईचा भाग म्हणून डिजिटल फलक उभारण्यात आलेल्या परिसराचे छायाचित्रीकरण करण्यात आले आहे.
आयुक्त गुडेवार यांनी कर्तव्य कठोरपणे डिजिटल फलकांच्या विरोधात कारवाईचा धडाका हाती घेतल्याने शहरवासीयांसाठी हा कौतुकाचा विषय ठरला आहे. एखादा कार्यक्षम आणि कर्तव्यदक्ष अधिकारी कायद्याची अंमलबजावणी प्रभावीपणे कशी करू शकतो, याचा अनुभव आयुक्त गुडेवार यांच्या कार्यशैलीवरून सोलापूरकर घेत आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा