आदल्या दिवशी अवकाळी पावसाचा फटका सहन करणाऱ्या नाशिक जिल्ह्यात दुसऱ्याच दिवशी म्हणजे मंगळवारी उन्हाचे चटके सहन करावे लागले. ढगाळ हवामान व अधूनमधून येणारी थंडीची लाट या हवामानात आमूलाग्र बदल झाले. कमाल तापमानाचा पाराही या दिवशी ३४.४ अंशावर पोहोचला. फेब्रुवारी महिन्यातील हे सर्वाधिक तापमान आहे.
हिवाळा निरोप घेण्याच्या मार्गावर असताना नाशिकसह उत्तर महाराष्ट्राला फेब्रुवारी महिन्यात सलग दोनदा अवकाळी पावसाचा सामना करावा लागला. दहा दिवसांपूर्वीच्या पावसाने वातावरणात कमालीचा गारवा निर्माण झाला होता. सोमवारी नाशिकसह उत्तर महाराष्ट्रातील बहुतेक भागांत ढगाळ वातावरण होते. सायंकाळी पावसाला सुरुवात झाली. यामुळे वातावरणात काहीसा गारवा निर्माण झाला. परंतु, त्याचे स्वरूप तात्कालिक राहिले. मंगळवारी सकाळपासून आकाश निरभ्र होते. यामुळे सूर्यदर्शन झाले. पण उन्हाची तीव्रता वाढल्याचे लक्षात येत होते. सकाळी अकरानंतर उन्हाचे चटके बसत होते. इतक्या प्रखर उन्हाची गेल्या काही महिन्यांत सवय राहिली नसल्याने त्याचा सामना करताना नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागला. या दिवशी कमाल तापमानही ३४.४ अंश सेल्सिअस नोंदले गेल्याची माहिती हवामानशास्त्र विभागाकडून देण्यात आली. फेब्रुवारी महिन्यातील हे सर्वाधिक तापमान असल्याचे या विभागाने म्हटले आहे. हवामानातील हे बदल निरनिराळ्या आजारांना निमंत्रण देणारे ठरले आहेत. दरम्यान, फेब्रुवारीतील हे तापमान आगामी उन्हाळ्याची चाहूल देत आहे. उत्तर महाराष्ट्रात टळटळीत उन्हाचा तडाखा सर्वसाधारपणे एप्रिल व मार्च महिन्यांत बसतो. यंदा पावसाचे प्रमाण समाधानकारक राहिल्याने हिवाळ्यात प्रदीर्घ काळ थंडीची अनुभूती मिळाली. उन्हाचे बसणारे चटके हिवाळा निरोप घेत असल्याचे निदर्शक आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा