वार्षिक उत्पन्नापेक्षा देखभाल दुरुस्तीचा खर्च दुपटीहून अधिक झाल्याने तरण तलावांचे व्यवस्थापन ठाणे महापालिकेच्या लेखी ‘आमदनी आठ्ठनी खर्चा रुपया’ ठरू लागले आहे. त्यामुळे उत्पन्नातील ही तूट भरून काढण्यासाठी तरण तलावांच्या दरात वाढ करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. यासंबंधी महापालिकेने सविस्तर प्रस्ताव तयार केला असून त्यामध्ये पुढील दोन वर्षांत दरात १० ते १५ टक्के वाढ करण्याचे सुचविले आहे. येत्या गुरुवारी होणाऱ्या सर्वसाधारण सभेत हा प्रस्ताव अंतिम मंजुरीसाठी आणण्यात आला आहे.
ठाणे महापालिकेचे शहरात मारोतराव शिंदे तर कळवा भागात कै.यशवंत रामा साळवी असे दोन तरण तलाव आहेत. २००९ मध्ये महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत तरण तलाव दर निश्चित करण्यात आले होते. मात्र या दरातून मिळणारे उत्पन्न तलावांच्या देखभालीसाठी तुटपुंजे ठरू लागले आहे. परिणामी वार्षिक उत्पन्न आणि खर्च यामधील तफावत वाढतच आहे.
तलावांची निगा व देखभाल, दुरुस्ती, कर्मचाऱ्यांचे वेतन, साधनसामग्री आणि किरकोळ गोष्टींवर होणारा खर्च दुपटीने वाढलेला असताना त्या मानाने उत्पन्नामध्ये वाढ होत नसल्याचे महापालिकेच्या निदर्शनास आले आहे. विशेष म्हणजे, या खर्चामध्ये वीज बिलाचा समावेश नाही. त्यामुळे तरण तलावांचा खर्च पेलवताना महापालिकेस तारेवरची कसरत करावी लागत असल्याचे चित्र आहे.  याच पाश्र्वभूमीवर महापालिकेने या दोन्ही तरण तलावांच्या शुल्क दरवाढीचा सुधारित प्रस्ताव तयार केला असून त्यामध्ये २०१४ आणि १५ या दोन्ही आर्थिक वर्षांसाठी अनुक्रमे १० ते १५ टक्के दरवाढ करण्याचे सुचविले आहे. या दरवाढीमुळे तरण तलावांच्या वार्षिक उत्पन्नातील तूट भरून निघेल, अशी आशा महापालिकेस आहे.
एक कोटी रुपयांची वार्षिक तूट
मारोतराव शिंदे आणि कै.यशवंत रामा साळवी या दोन्ही तरण तलावाचे वार्षिक उत्पन्न सुमारे ३० ते ४० लाखांच्या घरात आहे. मात्र, या तलावाची निगा व देखभाल, दुरुस्ती, कर्मचाऱ्यांचे वेतन, साधनसामग्री आणि किरकोळ गोष्टींवर सुमारे एक कोटी ७० लाखांपर्यंत खर्च होत आहे. त्यामुळे गेल्या दोन वर्षांपासून दोन्ही तरण तलावांच्या उत्पन्नामध्ये सुमारे एक कोटीच्या घरात तूट येत आहे, अशी माहिती महापालिका सूत्रांनी दिली. 

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा