सध्या जेरबंद असलेल्या माना टेकडीवरील हल्लेखोर बिबटय़ाला प्राणीसंग्रहालयात सोडण्याचा निर्णय वनखात्याने घेतला आहे. नागपूरच्या महाराजबाग संग्रहालयात प्राण्यांची गर्दी असल्याने त्यासाठी दुसरे ठिकाण शोधण्यात येत असून तसा पत्रव्यवहारही सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
बिबट व वाघांच्या संख्येत कमालीची वाढ झाल्याने व व्याघ्र प्रकल्प, तसेच जंगलालगतच्या गावातील गावकऱ्यांनी जंगलात अतिक्रमण केल्यापासून वन्यप्राणी व मानवातील संघर्ष अधिक तीव्र झाला आहे. त्याचाच एक भाग म्हणून तीन वर्षांपूर्वी ब्रम्हपुरीलगतच्या जंगलात एका नरभक्षी वाघाने अवघ्या काही महिन्यात जवळपास तीस ते चाळीस लोकांना ठार केले होते, तर ताडोबा व लगतच्या परिसरातही हा संघर्ष तीव्र झाला आहे.
या उन्हाळ्यात ताडोबा बफर झोनमध्ये बिबट व वाघाने ८ लोकांची शिकार केली, तर दुप्पट लोकांना जखमी केले. माना टेकडीवरील बिबटय़ानेही दोघांची शिकार करून काहींना जखमी केले. यावर्षी जिल्ह्य़ात बिबट व वाघाच्या हल्ल्यांच्या ६० वर घटना घडल्या. यातील बहुतांश घटना ताडोबा व लगतच्या परिसरातील आहेत. यातील चार बिबटय़ांना वनखात्याने जेरबंद करून सलग तीन महिने मोहुर्ली येथील प्राणी बचाव केंद्रात ठेवले होते. त्या काळात हल्ल्यांच्या घटना कमी झाल्या होत्या, परंतु रेडिओ कॉलर लावून बिबटय़ांना निसर्गमुक्त करताच हल्ल्यांना सुरुवात झाली आहे.
बोर्डाच्या जंगलात रेडिओ कॉलर लावून बिबटय़ाला सोडताच एका पाठोपाठ एक हल्ल्याच्या तीन घटना घडल्या, तर माना टेकडीवरील बिबटय़ाने एका शाळकरी विद्यार्थ्यांला जखमी केले. यातील माना टेकडीवरील बिबट जेरबंद करण्यात आला, तर बोर्डाचा बिबट निसर्गमुक्तच आहे.
माना टेकडीवरील बिबट रामबाग नर्सरीत १५ दिवसापासून जेरबंद असून त्याला प्राणीसंग्रहालयात सोडण्याचा निर्णय वनखात्याने घेतला आहे.
बिबट प्राणी संग्रहालयात राहिला तर हल्ले होणारच नाही आणि पर्यटकांनाही बिबटय़ाला सहज बघता येईल, असेही वनाधिकाऱ्यांचे म्हणणे आहे, परंतु वरिष्ठ पातळीवर याला विरोध होता. मात्र, बिबटय़ांच्या नियमित हल्ल्यांच्या घटना लक्षात घेता हा विरोध मावळला आहे. वनखात्याला नियमित बसणाऱ्या आर्थिक भरुदडापासून सुटका व्हावी, यासाठी ही सूचना खरोखरच स्वागतार्ह आहे.
मात्र, प्रत्येक हल्लेखोर बिबटय़ाला प्राणी संग्रहालय किंवा बचाव केंद्रात ठेवले तर जन्मदरावर परिणाम होण्याची शक्यता अभ्यासकांनी वर्तवली आहे.
अखेर हल्लेखोर बिबटय़ाला प्राणीसंग्रहालयात सोडणार
सध्या जेरबंद असलेल्या माना टेकडीवरील हल्लेखोर बिबटय़ाला प्राणीसंग्रहालयात सोडण्याचा निर्णय वनखात्याने घेतला आहे. नागपूरच्या महाराजबाग संग्रहालयात प्राण्यांची गर्दी असल्याने त्यासाठी दुसरे
First published on: 27-09-2013 at 08:59 IST
मराठीतील सर्व नागपूर वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Now the leopard get relif