गंगापूर धरण ओसंडून वाहू लागल्यामुळे नाशिककरांमध्ये वर्षभराची तहान भागल्याची भावनाही त्याच पद्धतीने ओसंडत असली तरी यंदा हंगामाच्या पुर्वार्धात निर्माण झालेली ही स्थिती उत्तरार्धात पाटबंधारे विभाग, महापालिका आणि जिल्हा प्रशासनासह सर्वाची परीक्षा पाहणारी ठरणार आहे. पाच वर्षांपूर्वीच्या महापुराचा अनुभव लक्षात घेता पुढील दोन महिने पाटबंधारे विभागाला पूर नियंत्रणाची तर अन्य यंत्रणांना नदीकाठ परिसरात आपत्ती निवारणार्थ कसरत करावी लागणार आहे. ‘गंगापूर’मध्ये पुराचे पाणी साठविण्याची क्षमताच नसल्याने त्र्यंबकेश्वर परिसरात गतवेळ प्रमाणे अतिवृष्टी झाल्यास धरणातील पाण्याचा विसर्ग कधीही वाढविला जाऊ शकतो. हा धोका लक्षात घेऊन शासकीय यंत्रणांबरोबर नदीकाठावरील रहिवाशांनी सतर्कता बाळगणे अनिवार्य झाले आहे.
शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या गंगापूर धरणाचे दरवाजे दोन वर्षांनंतर प्रथमच उघडले गेल्यावर सध्या पावसाचा अंदाज घेऊन विसर्ग वाढविण्यात येत आहे. मागील काही चांगल्या पर्जन्यमान वर्षांंचा आढावा घेतल्यास गंगापूरमधून सर्वसाधारणपणे ऑगस्टच्या अखेरीस अथवा सप्टेंबरमध्ये पाणी सोडण्याची वेळ येते. यंदा ही घटीका ऑगस्टच्या अगदी प्रारंभीच भरल्यामुळे दक्षता बाळगण्याचा कालावधी देखील वाढला आहे. १९ सप्टेंबर २००८ रोजी महापुराने शहराला तडाखा दिला होता. त्यानंतर आरोप-प्रत्यारोपांच्या डोहात पूर अथवा महापुराच्या कारणांवर बरीच खडाजंगी झाली खरी, मात्र त्यावर तोडगा काढण्याच्या दृष्टिने आवश्यक काही उपायांची आजही पूर्तता झालेली नाही. त्यातील एक म्हणजे गंगापूर धरणाची उंची वाढविण्याचा. या कारणास्तव धरणातून पाणी सोडण्याचे व्यवस्थापन अतिशय जिकिरीचे ठरते. पावसाळ्यात जेव्हा धरण पूर्ण क्षमतेने भरण्याच्या मार्गावर असते, तेव्हा पुराची शक्यता बळावते. त्याचे कारण धरणाची पूर्ण संचय पातळी आणि महत्तम पूर पातळीशी निगडीत आहे. गंगापूर हे जुने धरण असल्याने त्याच्या बांधणीवेळी याचा विचार झाला नव्हता. पण, मागील दोन दशकांपासून नव्याने बांधण्यात येणाऱ्या धरणात या मुद्याचा गांभिर्याने विचार केला जातो. या निकषाच्या आधारे बांधलेल्या धरणात पूर्ण संचय क्षमता लक्षात घेऊन महत्तम पूर पातळी निश्चित केली जाते. धरण पूर्ण भरल्यावर त्यात काही जागा रिक्त राहील याची तजविज केली जाते.
ढगफूटी वा मुसळधार वृष्टी झाल्यास धरणात अचानक येणाऱ्या पाण्याचा लोंढा काही काळ सामावून घेण्यासाठी या मोकळ्या जागेचा (महत्तम पूर पातळी) उपयोग होत असतो. अशा प्रसंगी धरणातून पाणी बाहेर काढण्याची प्रक्रिया सुरू असते. पण, पावसाचे धरणात येणारे आणि धरणातून बाहेर काढले जाणारे पाणी याचे प्रमाण कमालीचे व्यस्त असते. या स्थितीत धरणात येणारे पुराचे पाणी काही काळ साठविण्याकरिता महत्तम पूर पातळीचा उपयोग होतो. गंगापूर धरणात या स्वरूपाची व्यवस्थाच नाही. म्हणजे, या धरणाची पूर्ण संचय पातळी व महत्तम पूर पातळी ही एकच आहे. यामुळे अचानक पाण्याचा लोंढा आल्यास धरणात तो सामावून घेण्यासाठी पुरेशी जागा नसते. दुसरीकडे धरणाच्या दरवाजांमधून ८१ हजार तर ‘ब्रिचिंग सेक्शन’ (कच्ची मातीची भिंत) ४० हजार या दोन मार्गांनी १, २१००० क्युसेक्स पाणी सोडण्याची क्षमता आहे. धरणात पुराचे पाणी काही काळ सामावून घेण्यासाठी पाटबंधारे विभागाने उंची वाढविण्यासाठी शासनाकडे पाठविलेला प्रस्ताव पाच वर्षांपासून लालफितीत अडकला आहे. या संदर्भात नाशिकचे पालकमंत्री असो की मनसेचे तिन्ही आमदार असोत, कोणीही पाठपुरावा केलेला नाही. स्वयंचलीत पाणी पातळीदर्शक यंत्रणा, स्वयंचलीत र्पजन्यमापक केंद्र, प्रवाहाच्या मोजमापासाठी सरीता मापन केंद्र, अशा साधनांनी पूर पूर्वानुमानासाठी अत्याधुनिक साधनांचा
वापर केला जात आहे. परंतु, गंगापूर धरण यावर्षी नेहमीपेक्षा आधीच भरण्याच्या मार्गावर असल्याने पाणी सोडताना पाटबंधारे विभागाच्या नियोजनाचा खरा कस लागणार आहे.
गंगापूरमधील महत्तम विसर्ग
१९६६- २९ हजार ४७५ क्युसेक्स
१९६९ – ५० हजार क्युसेक्स
१९६७ – ३६ हजार ६७४ क्युसेक्स
१९६८ व ७६ – ३८ हजार क्युसेक्स
२००६ – २४ हजार ६६७
२००८ – ४२ हजार क्युसेक्स