विदर्भात दमदार पावसामुळे जून महिन्यातच पाच मोठय़ा प्रकल्पांमधून पाणी सोडण्याची वेळ आली असून, गुरुवारी गोसीखूर्द, लोअर वेणा नांद, कामठी खरी, पोथरा आणि पूस प्रकल्पाचे दरवाजे किंचित खुले करण्यात आले आहेत. काही मध्यम प्रकल्पांचे दरवाजे देखील उघडण्यात आले आहेत. गुरुवारी भंडारा जिल्ह्य़ातील गोसीखुर्द प्रकल्पातून  १२६० क्यूसेक्स इतका पाण्याचा विसर्ग होता. यवतमाळ जिल्ह्य़ातील पूस प्रकल्प आठवडाभरापूर्वीच तुडूंब भरला असून, सध्या ७४.१० क्यूसेक्स पाणी सोडले जात आहे. वर्धा जिल्ह्य़ातील पोथरा प्रकल्पातून ५९, नागपूर जिल्ह्य़ातील लोअर वेणा नांदमधून ४० तर कामठी खरी प्रकल्पातून ३१ क्यूसेक्स पाणी सोडले जात आहे. जून महिना संपण्याच्या आतच तब्बल पाच मोठय़ा प्रकल्पांमधून पाणी सोडले जाण्याची अलिकडच्या इतिहासातील ही पहिलीच वेळ आहे. मोठय़ा प्रकल्पांच्या पाणलोट क्षेत्रात गेल्या काही दिवसांपासून जोरदार पाऊस सुरू असून, धरणांच्या पाण्याच्या पातळीत मोठी वाढ झाली आहे. पावसाळा संपण्यास अजून तीन महिन्यांचा अवधी शिल्लक आहे. पाण्याचा येवा किती होऊ शकतो, याचा अंदाज घेत धरणांमधून जादा पाणी सोडले जात आहे. गोसीखुर्द धरणात १८७ दशलक्ष घनमीटर साठा झाला असून हे धरण ६२ टक्के भरले आहे. बुडित क्षेत्रातील गावांच्या पुनर्वसनाची कामे सुरू असल्याने धरणात पूर्ण क्षमतेने साठा निर्माण केला जाऊ शकत नाही, त्यामुळे अतिरिक्त पाणी सोडले जात आहे. गुरुवारी १२६० क्यूसेक्स पाणी सोडले जात होते, अशी माहिती जलसंपदा खात्यातील सूत्रांनी दिली.
पूस प्रकल्पात ९१ दलघमी साठा आहे. धरण १०० टक्के भरल्याने जादा पाणी सोडले जात आहे. या धरणाच्या सांडव्याहून ७४.१० क्यूसेक्सचा विसर्ग आहे.
 विदर्भातील काही मध्यम प्रकल्पांमधूनही पाणी सोडले जात आहे. त्यात वर्धा जिल्ह्य़ातील लाल नाला, चंद्रपूर जिल्ह्य़ातील चंदई, चांदगाव, चारगाव या प्रकल्पांचा समावेश आहे. लाल नाला प्रकल्पातून ६१.६५ क्यूसेक्स विसर्ग सुरू आहे. हे धरण ६६ टक्के भरले आहे. चंदईतून २.९४, चांदगावमधून २९.४२ आणि चारगावमधून १३.६३ क्यूसेक्स पाणी सोडले जात आहे.    विदर्भातील     दिना,   अरुणावती, वान, निम्न वेणा वडगाव या प्रकल्पांची पातळी  झपाटय़ाने वाढत चालली आहे.
दमदार पाऊस कायम राहिल्यास या प्रकल्पांमधून देखील लवकरच पाणी सोडण्याची पाळी येऊ शकते. दिना प्रकल्पात ८९ टक्के, अरुणावती प्रकल्पात ६३ टक्के, वानमध्ये ७५ टक्के, निम्न वेणा वडगावमध्ये ५९ टक्के पाणीसाठा झाला आहे. बुलढाणा जिल्ह्य़ातील खडकपूर्णा व पेनटाकळी या दोन प्रकल्पांच्या साठय़ात अद्यापर्यंत काहीही वाढ झालेली नाही. जलसाठय़ांच्या पातळीत लक्षणीय सुधारणा झाल्याने पाणी पुरवठा योजनांना पुरेसे पाणी मिळू लागले असून पाणीटंचाई दूर झाली आहे.