रस्त्यावरील अपघातांची संख्या वाढू लागल्यावर परवाने मिळविण्यासाठी द्यावी लागणारी परीक्षा आणखी कडक करण्याचा निर्णय परिवहन विभागाने घेतला आहे. राज्यातील ५० प्रादेशिक परिवहन विभागांपैकी २४ ठिकाणी संगणकीय परीक्षा घेण्यात येत असून तेथे किमान १२ प्रश्नांची उत्तरे योग्य दिल्यावरच शिकाऊ परवाना संबंधितांना मिळणार आहे.
राज्यात रस्ता अपघातात वर्षभरात सुमारे १३ हजार जणांचा मृत्यू झाला असल्याचा अधिकृत आकडा आहे. यात अनेकदा वाहन चालकांचा दोष आढळतो. त्यामुळे आता परिवहन विभागाने वाहनचालकांना वाहतूक नियमांचे ज्ञान पूर्ण असावे यासाठी शिकावू परवाना देतानाच अवघड परीक्षा घेण्याचा निर्णय घेतला आहे.
राज्यातील ५० प्रादेशिक परिवहन विभागांपैकी ज्या २४ ठिकाणी संगणकीय परीक्षा घेण्यात येते त्या ठिकाणी उमेदवारांना १० ऐवजी २० प्रश्न सोडवावे लागणार आहेत. त्यापैकी १२ प्रश्नांची योग्य उत्तरे संबंधितांना द्यावी लागणार आहेत. यामध्ये वाहन रस्त्यावरून चालविताना दिसणाऱ्या विविध मार्गदर्शक चिन्हांची ओळख, मोटार वाहन कायद्यातील वाहन चालविण्याबाबत असलेले नियम आदींचा समावेश आहे. ऑक्टोबर अखेरपासून हा निकष लावण्यात आल्याचे परिवहन सूत्रांनी सांगितले. या कडक परीक्षेमुळे अपघातांच्या प्रमाणाला आळा बसेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा