वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या मुंबईकरांनो, आता नियम मोडताना किमान दहा वेळा विचार करा. कारण नियम मोडल्यानंतर तुम्हाला दंड झाल्यास त्याची नोंद तुमच्या नावाने वाहतूक पोलिसांकडे कायमस्वरूपी राहणार आहे. तसेच आतापर्यंत कागदी पावती फाडणारे वाहतूक पोलीस तुमच्या हाती ‘ई-चलन’ टेकवणार आहेत. प्रादेशिक परिवहन कार्यालये आणि वाहतूक पोलीस यांनी एकत्रितपणे ही नवीन प्रणाली सुरू केली आहे. सुरुवातीला ही प्रणाली प्रायोगिक तत्त्वावर मुंबईतील पाच महत्त्वाच्या ठिकाणी राबवण्यात येणार आहे.
वाहतूक पोलिसांच्या हाती असणाऱ्या या ‘पॉइंट ऑफ सेल’ यंत्रांमध्ये प्रत्येक वाहनचालकाची संपूर्ण ‘कुंडली’ असेल. वाहनचालकाचा लायसन्स क्रमांक, वाहन नोंदणी क्रमांक या तपशीलांसह संबंधित वाहन किंवा वाहन चालक यांच्यावर कोणता गुन्हा दाखल झाला होता का, याचीही माहिती मिळेल. वास्तविक ही प्रणाली २०१२ मध्येच राबवण्यात येणार होती. मात्र वाहन चालकांची आणि वाहनांची माहिती संगणकीय स्वरूपात नोंदवण्याचे काम चालू असल्याने एक वर्षांचा कालावधी लागल्याचे वाहतूक पोलिसांतील सूत्रांकडून सांगण्यात आले.
एखाद्याने नियम मोडल्यास त्याचे लायसन्स प्रणालीद्वारे ‘स्वाइप’ केले जाईल. त्यावर चालकाची सर्व माहिती पोलिसांना कळेल. त्यानंतर होणारा दंड चालक आपल्या क्रेडिट किंवा डेबिट कार्डाद्वारे भरू शकणार आहे. या नव्या पद्धतीमुळे पारदर्शकता राहणार असून ही पद्धत वाहतूक पोलिसांचे श्रम वाचवणारी ठरणार आहे. गेल्या पाच वर्षांत ही प्रणाली चेन्नई, बेंगळुरू आणि हैदराबाद या प्रमुख शहरांमध्ये यशस्वीपणे राबवण्यात आली आहे. आता मुंबईतील पाच महत्त्वाच्या ठिकाणी प्रायोगिक तत्त्वावर ही प्रणाली राबवल्यानंतर तिचे यशापयश पडताळून संपूर्ण मुंबईभर ‘ई-चलन’ देण्यात येईल.