मार्चपासून सुरू झालेला हापूस आंब्याचा मोसम आता संपत आला आहे. बाजारात रत्नागिरी किंवा देवगड हापूसला मागणी असली तरी सर्वसाधारणपणे जूनच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवडय़ात हापूस आंबा बाजारातून काढता पाय घेतो. त्यानंतरही हापूस आंबे मिळत असले तरी त्याची चव उतरलेली असते. त्यामुळे आता बाजारात ‘लंगडा’, ‘नीलम’ आणि ‘तोतापुरी’ हे आंबे दिसू लागले आहेत.
यंदा हापूसची आवक भरपूर झाल्यामुळे मार्च-एप्रिलपासूनच ३०० ते ३०० रुपये डझन दराने हापूस मिळत होता. आता हा दर २०० ते २५० रुपयांवर उतरला आहे. दरवर्षीप्रमाणे जून महिन्यात मद्रास, गुजरात, कोलकोता, उत्तर प्रदेश येथील आंबे बाजारात आले आहेत. या आंब्यांची किंमतही सर्वसामान्यांच्या खिशाला परवडेल अशी आहे.
अंधेरी (पूर्व)येथील विक्रेते आर. के. गुप्ता यांनी सांगितले की, गुजरात, उत्तरप्रदेश, चेन्नई आदी ठिकाणाहून हे आंबे यायला सुरुवात झाली आहे. तोतापुरी आंबे २५ रुपये किलो तर बदामी आणि केसर ४० रुपये किलोने विकले जात आहेत. बेगमपल्ली, मद्रास केशर, जुनागढ केशर यासह गुजरातमधील केसर, वनराज, उत्तर प्रदेशातील दशेहरी, बंगालमधील हिमसागर, लंगडा, दक्षिण भारतातील तोतापुरी, नीलम, रुमानी आदी आंबे बाजारात आले आहेत. हापूसच्या तुलनेत हे आंबे आकाराने मोठे आहेत.
हापूसच्या तुलनेत याची किंमत कमी असल्याने ज्या लोकांना हापूस घेणे शक्य होत नाही ते हे आंबे खरेदी करतात, असे काही किरकोळ विक्रेत्यांनी सांगितले. या आंब्यांबरोबरच बाजारात सध्या रायवळ आंबेही उपलब्ध असून हे आंबे आकाराने खूप छोटे असले तरी ते चोखून खाण्यात मजा असते. हे आंबे ४० ते ६० रुपये डझन अशा दरात मिळत आहेत. वटपौर्णिमेपर्यंत हे आंबे मिळत राहतील.
मुंबईकरांच्या दारी आता ‘लंगडा’, ‘नीलम’ आणि ‘तोतापुरी’!
मार्चपासून सुरू झालेला हापूस आंब्याचा मोसम आता संपत आला आहे. बाजारात रत्नागिरी किंवा देवगड हापूसला मागणी असली तरी सर्वसाधारणपणे जूनच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवडय़ात हापूस आंबा बाजारातून काढता पाय घेतो.
First published on: 06-06-2013 at 12:09 IST
मराठीतील सर्व मुंबई वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Now various types of mangos in the market