जरा मदत करता का.. याचा अर्थ काय.. अजून कुठली कागदपत्रे जोडायची आहेत? या सारख्या असंख्य प्रश्नांची सरबत्ती मंगळवारी दिवसभर महाविद्यालयांच्या आवारात सुरू राहिली. गुणवत्ता यादीतील प्रवेश पूर्ण झाल्यावर रिक्त जागांवर प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांना स्थान मिळू शकते. सर्वाधिक ओढा असणाऱ्या विज्ञान व वाणिज्य शाखेसाठी गुणवत्ता यादीनुसार प्रवेश दिले जात असले तरी कला शाखेसाठी मात्र जो येईल, त्याला प्रवेश अशी पद्धत अनुसरण्यात आली आहे.
प्रतीक्षा यादी जाहीर झाल्यानंतर प्रत्यक्ष प्रवेश घेण्यास सोमवारपासून सुरूवात झाली. शालेय जीवनानंतर प्रथमच महाविद्यालयात पाऊल टाकणारी नवखी मंडळी या प्रक्रियेबाबत काहिशी अनभिज्ञ असल्याने अखेरच्या क्षणापर्यंत कागदपत्रांची पूर्तता करताना त्यांची दमछाक झाल्याचे पहावयास मिळाले. अनेकांनी अशा समस्यांना सामोरे जावे लागू नये म्हणून पालकांना सोबत आणण्याची खबरदारी घेतली. आवश्यक कागदपत्रे, छायांकित प्रती या सगळ्यांची जमवाजमव करताना अनेकांच्या नाकी नऊ आले. याबाबत काही महाविद्यालयांत स्वयंस्फुर्तीने काही विद्यार्थ्यांनी या मंडळींना मार्गदर्शन करण्याची व्यवस्था केली.
एरवी कुठल्याही मोर्चे वा आंदोलनात सहभागी होणारी राजकीय मंडळी यंदा छायांकनांची व्यवस्था करण्यात मागे पडल्याचे दिसून येते. काही महाविद्यालय त्यास अपवाद होते. ‘सीबीएसई’च्या विद्यार्थ्यांना मूळ गुणपत्रिकेची डोकेदुखी मागे लागली. महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाच्यावतीने दहावी गुणपत्रकाचे वाटप झाले असले तरी सीबीएसई शिक्षण मंडळाकडून सोमवापर्यंत गुणपत्रकाचे वाटप झाले नव्हते. मंगळवारी दुपारनंतर सीबीएसईच्या विद्यार्थ्यांच्या हातात गुणपत्रक पडल्यामुळे या विद्यार्थ्यांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. महाविद्यालयाच्या आवारात राजकीय मंडळीचा वावर प्रकर्षणाने जाणवत आहे. यामुळे दैनंदिन कामकाजात अडथळे येत असल्याची तक्रार प्राचार्याकडून करण्यात आली. यंदा विज्ञान शाखेकडे विद्यार्थ्यांचा प्रामुख्याने कल असून त्या खालोखाल वाणिज्य शाखेला पसंती मिळाल्याचे दिसत आहे. परिणामी, शहर-परिसरात सर्वच महाविद्यालयांमध्ये कला शाखेसाठी कुठल्याही प्रकारची गुणवत्ता यादी जाहीर न करता थेट प्रवेश देण्यात येत आहे. मंगळवारी दुपापर्यंत हं. प्रा. ठा. कला आणि रा. य. क्ष. विज्ञान महाविद्यालयात कला शाखेसाठी ११७ व विज्ञान शाखेत ३०६ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले. तसेच एम.सी.व्ही.सी. साठी ३९ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला. के. टी. एच. एम. महाविद्यालयात कला, वाणिज्य, विज्ञान आणि एम. सी. व्ही. सी. साठी जवळपास एक हजार प्रवेश पूर्ण झाले. बी. वाय. के. महाविद्यालयात प्रवेश प्रक्रिया अंतिम टप्प्यात असून गुरूवार-शुक्रवारी प्रतीक्षा यादीतील निवडक विद्यार्थ्यांना प्रवेश दिले जातील, असे सांगण्यात आले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व नाशिक वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Now waiting for waiting list
Show comments