अंमली पदार्थाचे व्यवहार रोखण्यासाठी पोलीस आणि अंमली पदार्थ विरोधी पथकाने कंबर कसली असली तरी या व्यवासायातले माफिया पोलिसांवर मात करण्यासाठी विविध मार्गाचा अवलंब करत आहेत. मुंबई पोलिसांना काही संकेतस्थळांची माहिती मिळाली असून त्याद्वारे अंमली पदार्थाची विक्री केली जात असल्याची बाब समोर आली आहे.
अंमली पदार्थाचे जाळे जगभर पसरले आहे. अगदी गल्लीबोळात मिळणाऱ्या गांजापासून हेरॉईनसारख्या अंमली पदार्थाचा त्यात वापर होतो. हायप्रोफाईल लोकांमध्येही अंमली पदार्थाच्या सेवनाचे प्रमाण मोठे आहे. परंतु विमानतळावर सुरू असलेली पाहणी आणि विविध ठिकाणी सुरू असलेले छापासत्र यामुळे अंमली पदार्थाची विक्री करणाऱ्यांनी संकेतस्थळाचा वापर सुरू केला आहे. त्यापैकीच एक संकेतस्थळ ‘सिल्क रोड’ नावाने कार्यरत आहे. अनेक वस्तूंची घरपोच सेवा देण्याचा दावा या संकेतस्थळामार्फत केला जातो. या संकेतस्थळावरून अंमली पदार्थाची विक्री केली जात असल्याची माहिती पोलिसांनी दिली. कॅनडातून हे संकेतस्थळ चालवले जाते. त्यामुळे पोलिसांनी त्यावर लक्ष ठेवले आहे. परदेशातील अनेक संकेतस्थळांवरून अंमली पदार्थ विकले जातात. त्यापैकीच हे एक संकेतस्थळ असावे, असे पोलिसांनी सांगितले. आम्ही या संकेतस्थळावरून मुंबईतून केल्या जाणाऱ्या व्यवहारावर लक्ष ठेवून आहोत, असेही पोलिसांनी सांगितले.

Story img Loader