रोहयोतील कुशल कामासाठी असलेली ४० टक्के रक्कम हडपता यावी म्हणून कुरखेडय़ातील बेकायदेशीर कार्यालयातच खोटी देयके तयार करण्याचा उद्योग वनधिकाऱ्यांनी गेल्या चार वषार्ंपासून चालवल्याचे आता स्पष्ट झाले आहे. या गैरव्यवहारावर कर्तव्यदक्ष म्हणवून घेणाऱ्या वरिष्ठ वनाधिकाऱ्यांनी बाळगलेले मौन आश्चर्यकारक आहे.
वडसा वनविभागाच्या कुरखेडा, पुराडा, बेडगाव, मालेवाडा या चार क्षेत्रात कुशल कामासाठी वस्तूंचा पुरवठा करणाऱ्या कांबळे सप्लायर व बिल्डर्स या नावाचे एकही दुकान गेवर्धा, गुरनुली वा कुरखेडा या गावात अस्तित्वात नाही. रोहयोच्या कामावर कोटय़वधीचे दगड, मुरूम, गिट्टी पुरवणाऱ्या भुवनेश्वर कांबळेजवळ एकही जड वाहन नाही. आपल्या मुलांचा असा काही व्यवसाय आहे, हे कांबळे व विनोद पदाच्या आई-वडिलांनाच ठाऊक नाही. मिळणाऱ्या वेतनातले पैसे त्यालाच अपुरे पडतात. तो आम्हाला कुठून देणार, असा प्रश्न त्याच्या आईवडिलांनीच लोकसत्ताशी बोलतांना उपस्थित केला. तरीही हे दोन तरुण आम्हीच पुरवठादार आहोत, या दाव्यावर कायम आहोत. या दुकानाची एक शाखा नागपुरात आहे. भरतनगर, नरेंद्रनगर, असा पत्ता देयकावर आहे. प्रत्यक्षात या भागात या गैरव्यवहाराचा मुख्य सूत्रधार असलेला निवृत्त वनाधिकारी राहतो, असे चौकशीत आढळून आले.
दुकानाचा फलक व पुरवठा करणारी वाहने नागपुरात आहेत, असे कांबळे व पदाने लोकसत्ताशी बोलतांना सांगितले. कुरखेडय़ातील बेकायदेशीर कार्यालयात तीन संगणक व कलर प्रिंटर सुद्धा आहे. त्यावरच ही खोटी देयके तयार केली जातात, असे याच कार्यालयात काम करणाऱ्या एका तरुणाने नाव न प्रकाशित करण्याच्या अटीवर सांगितले. रोहयोत कुशल कामासाठी वापरला जाणारा ४० टक्के निधी हडपता यावा म्हणूनच या तरुणांना समोर करून खोटी देयके तयार करण्याचा उद्योग करण्यात आला, असे संपूर्ण प्रकरण तपासल्यावर स्पष्टपणे आढळून येते.
हा निधी हडपण्यासाठी या अधिकाऱ्यांनी आणखी एक युक्ती वापरली आहे. या भागात रोहयोतून रोपवनाची कामे मोठय़ा प्रमाणावर करण्यात आली. झाडे लावण्याच्या या कामात कुशल, असे काहीच नसते. कुशल कामाचा निधी हडपता यावा म्हणून अधिकाऱ्यांनी रोपवन लागवड व पाण्याचा बंधारा तयार करण्याचे प्रस्ताव तयार करून ते प्रशासनाकडे सादर केले. बंधारा म्हटले की, आपसूकच कुशल कामाची निर्मिती होते. प्रशासनाने सुद्धा वृक्ष लागवडीचा व बंधाऱ्याचा संबंध काय, असा प्रश्न उपस्थित केला नाही व प्रस्ताव मंजूर केले. प्रत्यक्षात या भागात रोपवनाची झालेली कामे एका ठिकाणी व बंधारा भलत्याच ठिकाणी असल्याचे जंगलात फिरतांना आढळून आले. रोहयोच्या कामाची नियमित पाहणी करण्याची जबाबदारी वनाधिकारी, तसेच जिल्हाधिकारी कार्यालयाची आहे, पण कुणीही याकडे लक्ष दिले नाही. मिळालेल्या माहितीनुसार वनखात्यातील अनेक वरिष्ठांना या गैरव्यवहाराची कल्पना आहे, पण कुणीही त्याची दखल घेतली नाही. रोहयोच्या कामावर संशय घेणारी पत्रे याच भागातील काही अधिकाऱ्यांनी मुख्य वनसंरक्षक टी.एस.के. रेड्डी यांना पाठवली, पण त्यांनीही याकडे दुर्लक्ष केले. कुरखेडय़ात बेकायदेशीर कार्यालय उघडणारा निवृत्त वनाधिकारी हा एका आमदाराचा खास म्हणून असल्याने याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करण्यात आले, असे आता बोलले जाते. या निवृत्त अधिकाऱ्याला तीन परिक्षेत्राचा कार्यभार एकाच वेळी सोपवण्याचा आग्रह या आमदाराने धरला होता व अधिकाऱ्यांनी तो मान्यही केला होता, अशीही माहिती समोर आली आहे. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाची चौकशी स्वतंत्र यंत्रणेकडून होणे गरजेचे झाले आहे. (समाप्त)
यासंदर्भात मुख्य वनसंरक्षक रेड्डी यांच्याशी वारंवार संपर्क साधूनही त्यांनी प्रतिसाद दिला नाही. उपवनसंरक्षक आदर्श रेड्डी यांनी मात्र या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी केली जाईल व निवृत्त अधिकाऱ्यासह कुणाचीही गय केली जाणार नाही, असे लोकसत्ताशी बोलतांना स्पष्ट केले.
कुशल कामाच्यारकमेसाठी कुरखेडय़ात चार वर्षांपासून खोटय़ा
रोहयोतील कुशल कामासाठी असलेली ४० टक्के रक्कम हडपता यावी म्हणून कुरखेडय़ातील बेकायदेशीर कार्यालयातच खोटी देयके तयार करण्याचा
First published on: 12-12-2013 at 09:34 IST
मराठीतील सर्व नागपूर वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Nrega corruption in chandrapur