ठाणे परिवहन समिती सभापतीपदाच्या निवडणुकीत भाजपचा एक सदस्य गळाला लावत युतीला धक्का देणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी येत्या दोन महिन्यांत ‘टीएमटी’चा कायपालट करण्याचा आराखडा पत्रकारांपुढे सादर केला. ठाणेकरांच्या दिमतीला ३०० बसेस, आगारात उभ्या असलेल्या सुमारे ८० नादुरुस्त बसेसचे परिचालन, कर्मचाऱ्यांचा प्रलंबित निधीचा मार्ग मोकळा करणे तसेच १० मिडी बसेसची खरेदी, अशी मोठाली आश्वासने राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाडांनी दिली खरी, मात्र येत्या दोन महिन्यांत ती प्रत्यक्षात उतरविणे शक्य आहे का, याविषयी मात्र त्यांनी मौन पाळणेच पसंत केले. ‘विकासाची दिशा तरी आम्हाला स्पष्ट आहे’, असा बचाव करत पत्रकारांपुढे आव्हाडांची पोपटपंची सुरूच होती. मात्र, सभापतीपदासाठी सुरू असलेल्या सर्वपक्षीय फोडाफोडीच्या राजकारणामुळे ‘टीएमटी’चा कायापालट होईल का, याविषयी मात्र आव्हाडांसह शहरातील सर्वच राजकीय नेत्यांनी मिठाची गुळणी धरल्याचे चित्र सोमवारी दिसत होते.
ठाणे परिवहन उपक्रमाच्या ताफ्यात सुमारे तीनशेहून अधिक बसेसचा ताफा असला तरी वारंवार नादुरुस्त पडणाऱ्या बसेसमुळे जेमतेम १८० गाडय़ांचे परिचालन करणे शक्य होते. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार ‘टीएमटी’च्या सुमारे १०० हून अधिक बसेस नादुरुस्त असून त्या दुरुस्त करण्यासाठी उपक्रमाकडे पुरेसा निधी नाही. या उपक्रमात मोठय़ा प्रमाणावर नोकरभरती केली गेल्याने तिचा आर्थिक भार तिजोरीवर पडत आहे. त्यामुळे प्रवाशांची संख्या मोठी असूनही पुरेशा प्रमाणात सुविधा पुरविणे ‘टीएमटी’ प्रशासनाला शक्य होत नाही, असे सध्याचे चित्र आहे. काही मार्गावर भाडेतत्त्वावर बसेस चालविण्याची नामुष्की यापूर्वीच उपक्रमाला पत्करावी लागली होती. घोडबंदर मार्ग ते रेल्वे स्थानक या मार्गावर मोठय़ा संख्येने खासगी बसेस धावतात. या बसेसना मोठय़ा संख्येने प्रवासी मिळत आहेत. टीएमटीच्या अपुऱ्या फेऱ्यांमुळे प्रवासी खासगी बसेसकडे वळत असून, ठाणेकरांना पुरेशा प्रमाणात सेवा पुरविण्यात उपक्रमाला अपयश आल्याचे हे द्योतक आहे. असे असतानाही मूळ दुखण्याचा इलाज शोधण्याऐवजी इनमीन दोन महिन्यांसाठी रिक्त असलेले सभापतीपद पटकविण्यासाठी ठाण्यात रंगलेले सर्वपक्षीय राजकारण सर्वसामान्य ठाणेकरांच्या जखमेवर मीठ चोळणारे ठरू लागल्याची प्रतिक्रिया व्यक्त होऊ लागली आहे. सभापतीपदाच्या निवडणुकीत विजय मिळवल्यानंतर महापालिका मुख्यालयात पत्रकारांशी बोलताना जितेंद्र आव्हाडांनी टीएमटीच्या विकासासाठी भलामोठा अजेंडा पत्रकारांपुढे सादर केला. शिवसेनेने टीएमटीचे बारा वाजवल्याचा आरोपही त्यांनी केला. दरम्यान, टीएमटीच्या नादुरुस्त गाडय़ा आगाराबाहेर आणणे हा आमचा प्रमुख उद्देश असून ३०० नव्या बसेस खरेदीसाठी केंद्र सरकारकडे पाठपुरावा केला जाईल, असे आश्वासनही आव्हाडांनी दिले. टीएमटीचा कायापालट घडवून आणणारा भलामोठा कार्यक्रम आव्हाडांनी ठाणेकरांपुढे ठेवला असला, तरी दोन महिन्यांत ते कसे शक्य होईल, हा सवाल मात्र अनुत्तरित राहिला आहे.

Story img Loader