महापालिका निवडणुकीत धुळेकरांनी विश्वास टाकूनही स्वपक्षातीलच नगरसेवकांमध्ये हाणामारी होऊन त्यांच्या कुटुंबीयांनी एकमेकांविरोधात गुन्हे दाखल केल्याने राष्ट्रवादीवर होणाऱ्या गुंडगिरीच्या आरोपांना तोंड देता देता स्थानिक नेत्यांच्या नाकी नऊ येऊ लागले आहे. विधानसभा निवडणुकीत पक्षासाठी हे आरोप त्रासदायक ठरू शकतात हे लक्षात घेत माजी आमदार राजवर्धन कदमबांडे यांनी जाहीर पत्रकाद्वारे गुंडगिरीविरुद्धची भूमिका मांडली आहे. यामुळे राष्ट्रवादीतील अनेक जण धास्तावले असून पक्षाला निष्कलंक आणि गुन्हेगारी प्रवृत्तींपासून मुक्त करण्यासाठी कदमबांडे कठोर निर्णय घेतील काय, असा प्रश्न चर्चिला जात आहे. महापालिका असो किंवा विधानसभेची निवडणूक असो, लोकसंग्राम पक्षाकडून म्हणजेच आ. अनिल गोटे यांच्याकडून राष्ट्रवादीविरुद्ध प्रचारात गुंडगिरीचा मुद्दा प्रभावीपणे वापरण्याचा प्रयत्न झाल्याचा इतिहास आहे. शहरातील गुंडगिरी वाढण्यास राष्ट्रवादी पक्षाचे पदाधिकारी कारणीभूत असल्याचा आरोप जाहीरपणे विरोधकांनी केला आहे. यंदाच्या महापालिका निवडणुकीतही हा प्रयोग झाला. शहरवासीयांनो तुम्हाला काय हवे? गुंडाराज की महिला राज, असा प्रश्न करीत लोकसंग्रामच्या महिला उमेदवारांना निवडून देण्याचे आवाहन आ. गोटे यांनी केले होते. माजी मंत्री रोहिदास पाटील यांनी काँग्रेसच्या उमेदवारांसाठी गल्लीबोळातून आणि अनेक वसाहतींमधून प्रचार फेऱ्या काढल्या होत्या. राष्ट्रवादीविरुद्ध जवळपास सर्वच पक्ष एकवटले होते. या सर्व पक्षांकडून शक्य त्या पद्धतीने राष्ट्रवादीविरुद्ध प्रचार करताना ‘गुंडांना अभय देणारा पक्ष’ असा मुद्दा वापरला गेला होता. या पाश्र्वभूमीवरही राष्ट्रवादीला तब्बल ३४ जागा देत शहरवासीयांनी कदमबांडे यांच्या नेतृत्वावर विश्वास टाकल्याचे अधोरेखित झाले. परंतु निकालाच्या दिवशीच राष्ट्रवादीच्याच एका विजयी नगरसेवकाने आपल्याच पक्षाच्या महिला नगरसेविकेच्या घरावर हल्ला करण्याची घटना घडली. या घटनेत दोन्ही बाजूंनी परस्परांविरुद्ध तक्रारी दाखल केल्या. पक्षाच्याच दोन नगरसेवकांमध्ये घडलेल्या या प्रकारामुळे राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांची चांगलीच पंचाईत झाली. विरोधकांनी हा मुद्दा चर्चेत ठेवल्यास विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीला त्याचा फटका बसू शकतो, हे ध्यानात घेऊन पक्षाने आता त्याविरोधात खंबीर भूमिका घेण्याचे ठरविले असल्याचे कदमबांडे यांनी गुंडगिरीविरुद्ध दिलेल्या इशाऱ्यातून स्पष्ट होत आहे. या इशाऱ्याप्रमाणे खरोखरच राष्ट्रवादीतून गुंड प्रवृत्तीला बाहेरचा रस्ता दाखविल्यास पक्ष धुळ्यात अधिक जोमाने वाढू शकेल, अशी भावना पक्षाच्या प्रामाणिक कार्यकर्त्यांची आहे.