पनवेल परिसरात सध्या हत्तीरोग पसरविणाऱ्या क्यूलेक्स डासांनी थैमान घातले आहे. रात्रीच्या वेळी शेकडोंच्या संख्येने घरांमध्ये घुसरणारे हे डास रोगराई पसरवीत असल्याने नागरिकांमध्ये घबराट पसरली आहे. पालिका तसेच सिडकोकडून याबाबत कोणतीही उपाययोजना होत नसल्याने येथील नागरिक त्रस्त झाले आहेत.
डबके, साचलेले सांडपाणी आणि अस्वच्छता यामुळे क्यूलेक्स डासांची पैदास जोमाने वाढत आहे. पनवेलकरांच्या मानगुटावर याआधीच वारंवार खंडित होणाऱ्या विजेचे भूत बसले असतानाच हवा घरात येण्यासाठी दारे-खिडक्या उघडल्यास हे डास नागरिकांची झोप उडवत आहेत. क्यूलेक्स डासांच्या वाढत्या संख्येमुळे नागरिकांना हत्तीरोग होण्याची शक्यता कीटकतज्ज्ञ डॉ. महेंद्र जगताप यांनी व्यक्त केली आहे.
पनवेल परिसरात हल्ली चावऱ्या डासांमुळे नागरिक हैराण झाले आहेत. रात्र झाली की हे डास घरात शिरून नागरिकांना चावा घेतात. रस्त्यातून चालतानाही हे क्यूलेक्स रात्रीच्या वेळी त्रास देत असतात. क्यूलेक्स हे डास फक्त चावरे असून त्यांच्यापासून मलेरिया (हिवताप) यासारखे साथीचे आजार होत नसल्याचे सिडकोच्या आरोग्यविभागाकडून सांगण्यात आले. उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये डासांचे प्रमाण कमी असते, असा कीटकतज्ज्ञांचा अंदाज आहे. मात्र गेल्या पंधरा दिवसांपासून क्यूलेक्स डासांच्या उत्पत्तीमुळे पनवेलसह सिडको वसाहती, नेरे, विचुंबे, तळोजा एमआयडीसी या परिसरातील नागरिक हैराण झाले आहे. बांधकामांसाठी खोदकाम होऊन साचलेले पाणी, मलयुक्त पाण्यावर मुख्यत्वे या डासांची पैदास  होते. याबाबत कीटकतज्ज्ञ डॉ. महेंद्र जगताप यांनी पनवेलच्या क्यूलेक्स डासांबद्दल नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. या डासांमुळे नागरिकांना हत्तीरोग होऊ शकतो, अशी भीती त्यांनी व्यक्त केली आहे. मलयुक्त सांडपाण्याच्या सेप्टिक टँकमध्ये या डासांची उत्पत्ती होऊ शकते. तसेच गटार, नाले, खाडी, होल्िंडग पाँड येथील थांबलेल्या पाण्यात या डासांची पैदास होते. क्यूलेक्स डासांच्या पैदासीचे ठिकाण शहरभरातून निश्चित करून प्रशासनाने त्यावर रासायनिक औषधफवारणी केल्यास या डासांची उत्पत्ती थांबेल. नागरिकांनीही त्यांच्या परिसरातील गटारे, नाल्यांमधील थांबलेल्या पाण्यावर रॉकेल टाकल्यास या डासांपासून मुक्तता मिळू शकेल. दरम्यान पनवेल नगरपालिकेच्या आरोग्य विभागाचे शैलेश गायकवाड यांच्याशी संपर्क साधला असता डासांचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी बीटेक या औषधाची फवारणी शहरात बाराही महिने सुरू असते, असे त्यांनी सांगितले.

क्यूलेक्स डासांपासून कसे वाचाल
क्यूलेक्स डास हे रात्रीच्या वेळी अधिक सक्रिय होतात. ते अंधाराच्या ठिकाणी आणि काळ्या कपडय़ांकडे आकर्षित होतात. झोपताना शक्य झाल्यास घरात मंद प्रकाश ठेवावा. झोपताना शक्यतो काळे कपडे टाळावे. शक्यतो डास प्रतिबंधक जेलचा उपयोग करावा. मात्र त्यापासून अनेकांना त्वचा संसर्ग होऊ शकतो. त्यामुळे या जेलचा उपयोग डॉक्टरांच्या सल्यानेच करावा. झोपताना शक्यता पांघरुणाचा रंग हा पांढरा शुभ्र असावा. घरातील दारे-खिडक्या सायंकाळी सहानंतर बंद कराव्यात.

Story img Loader