पहिल्या पर्वणीपेक्षा दुसऱ्या पर्वणीत भाविकांची संख्या अधिक राहण्याची शक्यता लक्षात घेऊन वाहनतळ व वाहतूक व्यवस्था करण्याची सूचना पोलीस आयुक्त कुलवंतकुमार सरंगल यांनी केली आहे. सिंहस्थ कुंभमेळ्यासंदर्भातील नियोजनाविषयी येथील जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते.
सिंहस्थाच्या तयारीत पोलीस आयुक्तालयाने आघाडी घेतली असून सर्वात आधी त्यांच्याकडूनच तयारी सुरू करण्यात आली होती. सिंहस्थात भाविकांच्या सुरक्षेविषयी पोलिसांकडून काटेकोर नियोजन करण्यात येत आहे. या बैठकीत विभागीय आयुक्त एकनाथ डवले यांनी विशेष निर्देश दिले. नाशिक व त्र्यंबकेश्वर येथील वाहनतळ परिसरातील सुविधांचे सूक्ष्म नियोजन करण्यात यावे, पर्वणीच्या वेळी येणारी गर्दी लक्षात घेऊन त्याप्रमाणात भाविकांसाठी सुविधा निर्माण करण्याची सूचना त्यांनी केली. सिंहस्थात शहरात विविध मार्गाने येणाऱ्या वाहनांची संख्या लक्षात घेऊन आवश्यक व्यवस्था करण्यात यावी.
प्रत्येक मार्गानुसार येणाऱ्या भाविकांची संख्या निश्चित करावी. भाविकांसाठी निवारा गृहांची संख्या वाढविण्यासाठी आवश्यकता भासल्यास जागा संपादन करण्यात यावी. येणारे वाहन २४ तास एका जागी थांबणार आहे, हे लक्षात घेऊन नियोजन करण्यात यावे. भाविकांना सहज कळतील असे दिशादर्शक फलक उभारावेत. प्रत्येक कामाची जबाबदारी योग्य अधिकाऱ्यावर सोपविली जाणार असून त्याच्या मार्गदर्शनाखाली इतर यंत्रणांनी परस्परांशी समन्वय करून जबाबदारी पार पाडावी, असेही डवले यांनी नमूद केले.
जिल्हाधिकारी दीपेंद्रसिंग कुशवाह यांनी भाविकांसाठी उपयुक्त माहिती संकेतस्थळावर टाकण्याची सूचना केली. अधिकाऱ्यांनी सर्व कामांचा बारकाईने अभ्यास करून सुस्पष्ट आराखडा तयार करावा.
शेवटच्या क्षणाला येणाऱ्या समस्यांचे आतापासून आकलन व विश्लेषण केल्यास वेळीच योग्य नियोजन करणे शक्य होईल. अधिकाऱ्यांनी खासगी वाहनतळांची माहिती संकलित करावी, असेही त्यांनी सांगितले.
 बैठकीस मुख्य कार्यकारी अधिकारी सुखदेव बनकर, पोलीस अधीक्षक संजय मोहिते, पोलीस उपायुक्त पंकज डहाणे, मेळा अधिकारी आर. के. गावडे, निवासी उपजिल्हाधिकारी जितेंद्र काकुस्ते, उपजिल्हाधिकारी उदय किसवे आदी उपस्थित होते.

Story img Loader