विविध प्रलंबित मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी महाराष्ट्र जलसेवा कर्मचारी महासंघाच्या जल अभियंता जलसेवा संघटनांच्या वतीने येथे आंदोलन करण्यात आले. या वेळी जीवन प्राधिकरणचे अधीक्षक अभियंता देवेंद्र लांडगे यांना निवेदनही देण्यात आले.
महाराष्ट्र जीवन प्राधिकरण व शासनाच्या नाकर्तेपणामुळे मागण्या मंजूर करण्यास वर्षांनुवर्षांचा कालावधी निघून गेला आहे. त्यामुळे नाइलाजास्तव महाराष्ट्र जलसेवा कर्मचारी महासंघास आंदोलनाचा निर्णय घ्यावा लागल्याचे महासंघाने निवेदनात म्हटले आहे.
निवेदनातील प्रमुख मागण्यांमध्ये १९९८ पासून बंद असलेली अनुकंपा भरती ताबडतोब करावी, सहाव्या वेतन आयोगातील वेतनाच्या फरकाची रक्कम भविष्य निर्वाह निधी खात्यात जमा करावी, सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना सहाव्या वेतनाच्या फरकाची रक्कम बँक खात्यात जमा करावी, २४ वर्षांची आश्वासीत प्रगती योजना तत्काळ लागू करावी, पदवीधारक शाखा अभियंत्यांची उपविभागीय अधिकारी पदावर पदोन्नती करावी, चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांना रिक्तपदी पदोन्नती द्यावी (उदा. वायरमन, पंप चालक, इलेक्ट्रिशियन इत्यादी), महाराष्ट्र जीवन प्राधिकरणातील कर्मचाऱ्यांचे महानगरपालिका, नगरपालिका, जिल्हा परिषद यांच्याकडे कायमस्वरूपी हस्तांतरण झाले आहे. त्यांची सर्व देणी रक्कम संबंधित स्थानिक स्वराज्य संस्थेकडे अदा करण्यात यावी, महापालिकेकडे वर्ग झालेल्या कर्मचाऱ्यांची सेवा अखंडित धरून कालबद्ध पदोन्नती करावी या मागण्यांचा समावेश आहे.
या सर्व मागण्यांसाठी महाराष्ट्र जलसेवा कर्मचारी महासंघाचे कार्यकारिणी व स्थानिक कर्मचाऱ्यांनी अधीक्षक अभियंता परिमंडळ यांच्या कार्यालयासमोर एक दिवसाचे धरणे आंदोलन केले. या आंदोलनामध्ये प्रादेशिक महामंत्री गजानन गटलेवार, अध्यक्ष टी. जी. पिंजन, कोषाध्यक्ष माधवराव लोहे, मुख्य संघटक रवींद्र परदेशी आदींसह महाराष्ट्रातून १००पर्यंत सभासद हजर राहतील, अशी माहिती महासंघाचे उपसरचिटणीस डी. पी. पाटील, उपाध्यक्ष एस. एल. चारभे यांनी दिली.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा