ओबीसी सेवा संघाचे दोन दिवसीय पाचवे राज्य अधिवेशन येथे होत असून राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष, सर्वोच्च न्यायालयाचे सेवानिवृत्त न्यायमूर्ती एम.एन.राव हे या अधिवेशनात उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत.
हे अधिवेशन स्थानिक संताजी सभागृहात ८ व ९ डिसेंबरला होत असून उद्या सकाळी १० वाजता उद्घाटन समाज समता संघाचे अध्यक्ष किशोर गजभिये यांच्या हस्ते होत आहे. या अधिवेशनात ओबीसींची जातीनिहाय जनगणना, नचिअप्पन समिती, पदोन्नतीतील आरक्षण, तामिळनाडू राज्याप्रमाणे क्रिमिलेअरची अट रद्द करणे, लोकसंख्यानिहाय आरक्षण, बिहारप्रमाणे ओबीसी विद्यार्थ्यांना भत्ता देणे, प्रत्येक जिल्ह्य़ात ओबीसी विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह सुरू करणे, शासनाचे शैक्षणिक धोरण, महाराष्ट्रातील ओबीसी विद्यार्थ्यांची व्यावसायिक अभ्यासक्रमातील शिष्यवृत्ती व शिक्षणशुल्क पूर्ती आदी विषयांवर विचारमंथन होणार आहे.
उद्घाटन सत्रात प्रमुख पाहुणे ओबीसी समर्थन समितीचे गुजरातचे अध्यक्ष जयंतभाई मनानी, बॅकवर्ड-क्लास फेडरेशन पाटणाचे अध्यक्ष आय.के.चंदापुरी, विदर्भ मुस्लिम मोर्चाचे संघटक मंसूर एजाज जोश राहणार आहेत.
दुपारच्या सत्रात ‘समता’चे संपादक प्रदीप गायकवाड, अन्य वक्ते ओबीसी महासभा पुणेचे अध्यक्ष डॉ.पी.बी.कुंभार व भटके विमुक्त संघर्ष परिषदेचे अध्यक्ष दोनानाथ वाघमारे विचार मांडणार आहेत. ‘ओबीसी आंदोलनाची दिशा व आव्हाने’ या विषयावरही चर्चा होणार आहे. रविवारी ‘ओबीसी वर्गाचे सामाजिक परिवर्तन ही व्यवस्था परिवर्तनाची अत्यावश्यक अट आहे’ या विषयावर सत्यशोधक संघटक प्रा.नूतन माळवी (वर्धा), ओबीसी सेवा संघ, विदर्भ-मराठवाडाचे प्रचारक बाळासाहेब गावंडे, ओबीसी सेवा संघाचे विदर्भ संघटक संतोष सुरपाटणे (यवतमाळ), ओबीसी सेवा संघ पुणे विभाग प्रमुख प्रा.दिगंबर लोहार (कोल्हापूर), ओबीसी सेवा संघाचे संघटक राजाराम सूर्यवंशी (मुंबई) हे विचार व्यक्त करतील. समारोपीय सत्राचे प्रमुख पाहुणे न्या. एम.एन.राव राहणार असून ए.आय.ओबीसीचे महासचिव जी.करुणानिधी (तामीळनाडू) राहतील.
कार्यक्रमाचे अध्यक्ष ओबीसी सेना संघाचे अध्यक्ष प्रदीप ढोबळे (मुंबई) राहतील.     

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा