इचलकरंजी शहर व परिसरातील सहकारी संस्थांतील गैरव्यवहाराविरोधात माहितीच्या अधिकारात आवाज उठविणारे निर्भय सामाजिक कार्यकर्ते हेमंत फुलचंद शहा (६३) यांच्या पार्थिवावर रविवारी पंचगंगा नदी घाटावरील मशानभूमीत अंत्यसंस्कार केले. शनिवारी  त्यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले.
बंद पडलेली डेक्कन सूतगिरणी, अर्बन बँक, पाश्र्वनाथ पतसंस्था, सूतगिरणी तसेच इचलकरंजी नगरपालिका येथील गैरकारभाराविरुद्ध गेली दहा वर्षे त्यांचा संघर्ष सुरू होता. माहितीच्या अधिकाराचा प्रभावी वापर करून अन्यायाला वाचा फोडणारा कार्यकर्ता अशी त्यांची ओळख होती.  माजी मंत्री प्रकाश आवाडे, जवाहर साखर कारखान्याचे उपाध्यक्ष विलास गाताडे, जनता बँकेचे अध्यक्ष अशोक सौंदत्तीकर, गजानन सुलतानपुरे, संजय कुलकर्णी, दिलीप माणगावकर, धनाजी नाईक यांनी अंत्यदर्शन घेतले. पंचगंगा नदी घाटावर त्यांचे सुपुत्र निखिल याने पार्थिवास भडाग्नी दिला. शोकसभेत आमदार सुरेश हाळवणकर, उत्तम आवाडे, उपनगराध्यक्ष बाळासाहेब कलागते, इंडस्ट्रियल इस्टेटचे अध्यक्ष राहुल खंजिरे, बाळ महाराज, पत्रकार रामचंद्र ठिकणे, अमर जाधव आदींची शोकसभेत भाषणे झाली.