नवजात बालकांमध्ये प्रतिकारशक्तीअभावी होणाऱ्या जन्मजात आजारांचे प्रमाण वेगाने वाढत चालले असून अशा ‘आयपीडी’ रुग्णांचे जीवन सुकर बनविण्याचे काम केईएम रुग्णालयातील ‘नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ इम्युनोहिमॅटॉलॉजी’तील डॉक्टर व संशोधक अहोरात्र करत असतात. या विषयावर भारतात व जगभर संशोधन सुरू असून त्याचा वेध मुंबईत होणाऱ्या एका आंतरराष्ट्रीय परिषदेत विख्यात डॉक्टरांकडून घेतला जाणार आहे. या परिषदेत प्रामुख्याने ‘रोगप्रतिकारशक्तीअभावी उद्भवणारे प्राथमिक आजार आणि भारतातील सद्यस्थिती’ यावर तज्ज्ञांकडून भाष्य केले जाणार आहे.
‘रोगप्रतिकारशक्तीअभावी होणारे रोग’ प्रामुख्याने नवजात बालकांमध्ये आढळून येतात. सुमारे १२० प्रकारचे हे आजार असून अंदाजे २०० जनुकांच्या आपापसातील संलग्नतेमधून ते उद्भवतात. यातील अनेक रुग्णांना घातक संसर्गजन्य रोग तसेच कर्करोग होत असल्याचेही दिसून आले आहे. दुर्देवाने बहुतेकदा वेळीच निदान न झाल्यामुळे रुग्ण दगावण्याचे प्रमाण मोठे आहे. जगभरात आयपीडीचे सुमारे एक कोटी रुग्ण असून भारतात त्यांची संख्या दहा लाखापेक्षा जास्त असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे.
भारतात केवळ दोन संस्थांमध्येच ‘आयपीडी’ च्या रुग्णांवर संशोधन व उपचार होतात. त्यातही या आजाराच्या चाचण्याही मर्यादित व महाग      आहेत.
‘नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ इम्युनोहिमॅटॉलॉजी’ या संस्थेत अशा रुग्णांवर उपचार व संशोधन होत असून केईएममधील ही संस्था व अमेरिकेतील ‘वर्ल्ड आयपीडी’ संस्थेच्या सहकार्याने येत्या २ ते ४ फेब्रुवारी रोजी हयात रिजन्सी हॉटेलमध्ये आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन केले आहे.
या परिषदेला दोनशेहून अधिक मान्यवर उपस्थित राहणार असून अमेरिकास्थित डॉ. सुधीर गुप्ता, केईएममधील संस्थेचे संचालक डॉ. घोष आणि वाडिया रुग्णालयाचे अधिष्ठाते डॉ. आंबडेकर यांचे या परिषदेसाठी मोलाचे योगदान असल्याचे सूत्रांनी सांगितले.