काँग्रेसमध्ये येत्या लोकसभा निवडणुकीसाठी इच्छूक उमेदवारांची चाचपणीची प्रक्रिया सुरू असताना अमरावती शहरात बुधवारी काँग्रेसमधील इच्छूकांनी पक्षाचे निरीक्षक रुद्रा राजू यांच्यासमोर शक्तीप्रदर्शनाचा प्रयत्न केला. या निवडणुकीत कोणत्याही पक्षासोबत आघाडी केली जाऊ नये, अमरावती मतदार संघात काँग्रेसचाच उमेदवार हवा, असा हट्ट अनेक नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी पक्षनिरीक्षकांसमोर धरला.
काँग्रेस पक्षाचे निरीक्षक राजू रुद्रा यांनी बुधवारी दिवसभर येथील विश्रामगृहात काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांशी आणि कार्यकर्त्यांशी चर्चा केली. अमरावती लोकसभा मतदार संघ अनुसूचित जातीसाठी राखीव असल्याने या संवर्गातील तिकिटोच्छुकांनी पक्षनिरीक्षकांसमोर कार्यकर्त्यांच्या मदतीने शक्तीप्रदर्शन केले. पक्षाचे निरीक्षक राजू रुद्रा यांनी पत्रकारांना या प्रक्रियेविषयी खुलासेवार माहिती देण्याचे टाळले, कार्यकर्त्यांशी चर्चा करून मतदार संघातील परिस्थिती जाणून घेण्याचा आपला प्रयत्न होता. कार्यकर्त्यांनी मनमोकळेपणाने आपली मते मांडली. यासंदर्भातील अहवाल पक्षाच्या सरचिटणीसांकडे सादर केला जाणार आहे, असे त्यांनी सांगितले.
दुसरीकडे, काँग्रेसच्या इच्छूक उमेदवारांनी अमरावती लोकसभा मतदार संघात येत्या निवडणुकीत काँग्रेस पक्षाचाच उमेदवार हवा, असा आग्रह पक्षनिरीक्षकांसमोर धरला. या मतदार संघात गेल्या अनेक निवडणुकांपासून काँग्रेस पक्षाचा उमेदवार नाही. आघाडी करून या ठिकाणी इतर पक्षाचे उमेदवार दिले जात असल्याने काँग्रेस कार्यकर्त्यांची कोंडी झाली आहे. कार्यकर्त्यांमध्ये नैराश्य आहे. त्यामुळे कोणत्याही पक्षाचा उमेदवार लादला जाऊ नये, असे उमेदवारांचे म्हणणे होते. काँग्रेसच्या अनेक नेत्यांनाही कार्यकर्त्यांच्या मताला सहमती दर्शवली.
गेल्या निवडणुकीत काँग्रेस पक्षाने राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोटय़ातून रिपाइंच्या गवई गटाचे उमेदवार डॉ. राजेंद्र गवई यांना उमेदवारी दिली होती, पण त्यांना पराभव पत्कारावा लागला होता. त्यापूर्वी ही जागा रिपाइंचे रा.सु. गवई यांच्यासाठी सोडली जात होती.
काँग्रेस पक्षाच्या उमेदवारीसाठी इच्छूक असलेल्या सुमारे ११ जणांनी आपले परिचय पत्र पक्षनिरीक्षक रुद्रा राजू यांच्याकडे सादर केल्याचे पक्षातील सूत्रांनी सांगितले. त्यात माजी नगरसेवक किशोर बोरकर, डॉ. राजीव जामठे आदींचा समावेश आहे. बडनेराचे आमदार रवी राणा यांच्या पत्नी नवनीत कौर-राणा यांच्या समर्थकांनीही विश्रामगृह परिसरात गर्दी केली होती. त्या स्वत: पक्षनिरीक्षकांना भेटायला आल्या नाहीत. जिल्हा परिषदेच्या राजकारणात सक्रीय असलेल्या काही काँग्रेस नेत्यांनीही आपले परिचय पत्र पक्षनिरीक्षकांना दिले.
रुद्रा राजू यांनी बुधवारी दिवसभर विधानसभा मतदार संघनिहाय कार्यकर्त्यांशी आणि पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली. यावेळी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बबलू देशमुख उपस्थित होते. काँग्रेसच्या आमदार यशोमती ठाकूर, वीरेंद्र जगताप, रावसाहेब शेखावत, केवलराम काळे यांनीही राजू रुद्रा यांची भेट घेतली. काँग्रेसच्या या चाचपणीमुळे काँग्रेसच्या इच्छूकांमध्ये उत्साहाचे वातावरण असले, तरी अंतिम निर्णय वरिष्ठ पातळीवरूनच घेण्यात येणार असल्याने कार्यकर्त्यांमध्ये साशंकता व्यक्त केली जात होती.

Story img Loader