मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या आजच्या नगर दौऱ्यात त्यांची व पत्रकारांची भेट टाळण्याचा आटोकाट प्रयत्न जिल्हा प्रशासनाने अखेरच्या क्षणापर्यंत केला. जिल्ह्य़ातील टंचाई निवारण्याच्या कामातील पाथर्डी, कर्जत येथील घोटाळे पत्रकारांच्या माध्यमातून राज्यभर गाजत असल्यामुळे  की काय जिल्हा प्रशासन सुरूवातीपासून पत्रकारांना लांबच ठेवण्याच्या प्रयत्नात होते.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या रस्त्यावरच्या प्रवेशद्वारापासूनच ही अडवणूक सुरू होती. पत्रकारांना आत जाऊ दिले जात नव्हते. ‘जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश आहे’ असे पोलीस अधिकारी सांगत होते. त्यामुळे काहींनी त्यांच्याबरोबर मोबाईलवर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. ते उपलब्ध झाले नाहीत म्हणून निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांबरोबर संपर्क साधण्यात आला. त्यांनीही ‘जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश आहे’ असेच सांगितले.
खुद्द जिल्हाधिकाऱ्यांनी ‘मुख्यमंत्री कार्यालयाचाच आदेश आहे’ असे सांगत हात वर केले. त्यानंतर काही पत्रकारांनी पालकमंत्री बबनराव पाचपुते यांना मोबाईल केला व जिल्हा प्रशासन पत्रकारांबरोबर चुकीचे वागत असल्याची तक्रार करत ‘आम्ही आता निदर्शने सुरू करतो’ असे सांगितले. पाचपुते यांनी ‘मी मुख्यमंत्र्यांबरोबर बोलतो’ असे सांगून ‘थोडा वेळ थांबा’ अशी विनंती पत्रकारांना केली.
दरम्यानच्या काळात रस्त्यावर उन्हातच थांबलेल्या पत्रकारांची ‘किमान कार्यालयात आत येऊन सावलीत तरी थांबू द्या’ ही विनंतीही जिल्हाधिकाऱ्यांनी अमान्य केली. त्यामुळे पोलीस लगेचच सगळ्यांना हाकलण्याच्या मागे लागले. तोपर्यंत पाचपुते यांचा निरोप मिळाल्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांच्या परवानगीने सर्व पत्रकारांची जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात बसण्याची व्यवस्था करण्यात आली व बैठकीनंतर मुख्यमंत्री तिथे येऊन पत्रकारांबरोबर बोलतील असे सांगण्यात आले.
मुख्यमंत्र्यांची बैठक संपेपर्यंत पत्रकार खाली सभागृहात बसून होते. बैठक संपल्यानंतर जिल्हाधिकारी डॉ. संजीवकुमार यांनी सभागृहात येऊन ‘मुख्यमंत्र्यांना उशीर झाला आहे, तुम्ही कार्यालयाच्या आवारात त्यांच्याबरोबर बोला’ असे पत्रकारांना सांगितले.
संतापलेल्या पत्रकारांनी लगेचच ‘काही जरूरी नाही, मुख्यमंत्र्यांच्या मागे जायची’ म्हणून नाराजी प्रदर्शित केली. त्यामुळे जिल्हाधिकारी गडबडले. मोठमोठय़ाने आवाज येऊ लागल्याने पालकमंत्री पाचपुते, महसुलमंत्री थोरात सभागृहात आले. काय झाले आहे ते त्यांच्या लगेच लक्षात आले व त्यांच्या पाठोपाठ मुख्यमंत्रीही सभागृहात आले. काही वेळ पत्रकारांशी बोलून अडचणीचे प्रश्न यायला सुरूवात होताच उशीर झाला आहे असे म्हणत तेही लगेच निघून गेले.
लोकप्रतिनिधींनाही मज्जाव
पोलीस अधिकारी सुरूवातीला पत्रकारांबरोबरच लोकप्रतिनिधींनाही जिल्हाधिकारी कार्यालयात प्रवेश करण्यास मज्जाव करत होते. खासदार दिलीप गांधी, आमदार अनिल राठोड, विजय औटी, महापौर शीला शिंदे यांनी ‘त्यांना काही कळते का’ असे सांगून पोलीस अधिकाऱ्यांबरोबर भांडून बैठकीत प्रवेश मिळवला. राठोड यांच्याबरोबर तर शिवसेनेचे शहरप्रमुख संभाजी कदम व अन्य काही कार्यकर्तेही होते. त्यांनाही प्रवेश मिळाला पत्रकारांना मात्र अखेपर्यंत बैठकीत येऊ दिले गेले नाही.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा