महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाने नवीन व उदयोन्मुख लेखकांसाठी ‘पहिल्या पुस्तकासाठी अनुदान मिळवा आणि लेखक व्हा’ ही योजना राबविण्याचे ठरवले आहे. अर्थात ज्या नवलेखकाचे एकही पुस्तक अद्याप प्रकाशित झालेले नाही, अशी लेखक मंडळींच्याच पहिल्या पुस्तकासाठी हे अनुदान देण्यात येणार आहे.ही योजना महाराष्ट्र आणि महाराष्ट्रबाहेरील मराठी नवलेखकांसाठीच असून नवलेखकांना कविता, कथा, कादंबरी, नाटक/एकांकिका, बालवाङ्मय आणि वैचारिक लेख/ललितलेख, चरित्र, आत्मकथन/प्रवासवर्णन या सहा साहित्य प्रकारासाठी हे अनुदान देण्यात येणार आहे. नवलेखकांना कोणत्याही एकाच वाङ्मय प्रकारासाठी केवळ एकच हस्तलिखित पाठविता येणार आहे.नवलेखक अनुदान योजनेअंतर्गत मंडळाने आत्तापर्यंत २,०९२ नवलेखकांना अनुदान दिले असून यामुळे नवीन लेखकांचे साहित्य मोठय़ा प्रमाणात प्रकाशित झाले आहे. त्यामुळे जास्तीत जास्त नवलेखकांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन मंडळाचे अध्यक्ष मधु मंगेश कर्णिक यांनी केले आहे. नवलेखकांनी आपले साहित्य येत्या ३० एप्रिलपर्यंत सचिव, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, रवींद्र नाटय़ मंदिर इमारत, दुसरा मजला, प्रभादेवी, दादर, मुंबई ४०००२५ या पत्यावर पाठवायचे आहे. अधिक माहितीसाठी ०२२-२४३२५९२९/२४३२५९३१ या क्रमांकांवर कार्यालयीन वेळेत संपर्क साधता येईल.

Story img Loader