सालेकसा तालुक्याच्या साखरीटोला येथील बॅरिस्टर राजाभाऊ कनिष्ठ महाविद्यालयातील माजी प्राचार्याने २००८-०९ व २००९-१० या वर्षांतील एका विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती हडपली. या विद्यार्थ्यांच्या तक्रारीवरून त्या माजी प्राचार्यावर सालेकसा पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला.
मक्काटोला येथील रेखलाल मोजी सहारे (२२) हा विद्यार्थी २००८-०९ मध्ये अकरावीत बॅरिस्टर राजाभाऊ कनिष्ठ महाविद्यालय साखरीटोला येथे शिकत होता. त्याने शिष्यवृत्तीसाठी अर्ज केला होता. मात्र, तेथे प्राचार्य असलेल्या मंगेश इस्तारी बळगे (५३) याने विद्यार्थ्यांच्या स्वाक्षरीच्या ठिकाणी खोटी स्वाक्षरी करून २००८-०९ या सत्रातील १ हजार ४०० रुपये, तर २००९-१० या बारावीच्या सत्रातील १ हजार ८०५ रुपये, असे ३ हजार २०५ रुपये हडपले. या विद्यार्थ्यांने शिष्यवृत्तीसाठी अर्ज केले असताना आरोपी प्राचार्य बळगे यांनी त्या विद्यार्थ्यांला तू अर्ज केला नाही, असे सांगून त्याला शिष्यवृत्ती दिली नाही. दोन वर्षे त्या विद्यार्थ्यांने शिष्यवृत्तीसाठी चकरा मारल्या. मात्र, त्याला प्राचार्याने शिष्यवृत्ती दिली नाही.
नाईलाजास्तव त्या विद्यार्थ्यांने यावर्षी माहितीच्या अधिकारात माहिती मागितली. या माहितीच्या अधिकारात रेखलाल शहारे याची शिष्यवृत्ती उचलल्याची माहिती पुढे आली. शिष्यवृत्तीसाठी अर्ज केलाच नाही, असे सांगणाऱ्या माजी प्राचार्याने त्या विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती स्वत:च हडपली. या प्रकरणाची तक्रार विद्यार्थ्यांने सालेकसा पोलिसांकडे केली. माजी प्राचार्य मंगेश बळगे यांनी खोटी स्वाक्षरी करून शिष्यवृत्तीचे पसे हडप केल्याच्या कारणावरून त्याच्याविरुद्ध सालेकसा पोलिसात गुन्हा दाखल केला आहे. आरोपी माजी प्राचार्य फरार आहे. या प्रकरणात विशेष म्हणजे, शिष्यवृत्तीचा त्या विद्यार्थ्यांने केलेला अर्ज त्याच शाळेत सापडला.

Story img Loader