लग्नसराईचा हंगाम सुरू होताच ठाण्यातील वेगवेगळी मंगल कार्यालये तसेच बडय़ा हॉटेलांबाहेर वाहनांच्या रांगा लागण्यास सुरुवात झाली असून अपुऱ्या पार्किंग व्यवस्थेमुळे रस्त्यांच्या कडेला उभ्या होणाऱ्या या वाहनांमुळे शहरातील वाहतूक व्यवस्थेचे अक्षरश: तीनतेरा वाजू लागले आहेत. हॉल भाडय़ाने देताना लाखो रुपयांचा नफा कमविणाऱ्या हॉटेल व्यवस्थापन पार्किंगची व्यवस्था करून देण्यात अपयशी ठरत असल्याने त्याचा परिणाम वाहतुकीवर होऊ लागल्याने असा अडथळा हॉल व्यवस्थापनाविरोधात थेट गुन्हे दाखल करण्याचा निर्णय ठाण्यातील वाहतूक पोलिसांनी घेतला आहे.
तसेच वारंवार तंबी देऊनही दाद देत नसलेल्या हॉल चालकांचे परवाने रद्द करण्याची तयारीही पोलिसांनी केली आहे. त्यामुळे वर्षोन्वर्षे वाहतुकीचे नियम धाब्यावर बसवून बिनधास्तपणे हॉलसमोरील रस्त्यावर वऱ्हाडी मंडळींना वाहने उभी करण्यास मुभा देणाऱ्या हॉल आणि हॉटेल मालकांचे धाबे दणाणले आहेत. ठाणे शहरातील मंगल कार्यालय आणि मोठमोठय़ा हॉटेलमधील सभागृह लग्न सोहळे तसेच इतर कार्यक्रमांसाठी उपलब्ध करून देण्यात येतात. हॉल तसेच हॉटेलच्या आवारात वाहने उभी करण्यासाठी पुरेशी जागा उपलब्ध नसल्यामुळे या कार्यक्रमाकरिता येणारी पाहुणे मंडळी रस्त्यावर वाहने उभी करू लागली आहेत. त्यामुळे शहरातील वाहतूक कोंडीत आणखी भर पडू लागली आहे. गेल्या काही वर्षांपासून हॉल तसेच हॉटेल मालकांचा उद्योग बिनदिक्कतपणे सुरू आहे. विशेष म्हणजे, मंगल कार्यालय परिसरातील रस्त्यावरून वधू-वराची वरात काढण्यात येत असल्यामुळे शहरातील रस्त्यांवर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागत असल्याचे चित्र दिसून येते. या वाहतूक कोंडीत अडकून पडणाऱ्या ठाणेकरांच्या रोषाला वाहतूक पोलिसांना सामोरे जावे लागते. याच पाश्र्वभूमीवर ठाणे वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त डॉ. श्रीकांत परोपकारी यांनी शहरातील मंगल कार्यालय आणि मोठ-मोठय़ा हॉटेल व्यवस्थापनास नोटिसा बजावण्यास सुरुवात केली आहे. वाहतूक कोंडी होऊ नये, यासाठी महत्त्वाच्या पाच सूचना त्यांनी केल्या आहेत.
महत्त्वपूर्ण सूचना..
बांधकामाच्या मंजूर आराखडय़ाप्रमाणे मंगल कार्यालय आणि हॉटेलच्या परिसरात स्वतंत्र पार्किंगची व्यवस्था केली जाते. मात्र, त्या जागेचा उपयोग नंतर अन्य कामांसाठी करण्यात येतो. त्यामुळे पार्किंगसाठी राखीव ठेवलेल्या जागेचा वापर पार्किंगकरिताच करावा, अशी तंबी वाहतूक पोलिसांनी हॉटेल मालकांना दिली आहे. पार्किंगची व्यवस्था नसल्यास कार्यक्रमाच्या दिवशी हॉलच्या परिसरात वाहतुकीचे नियमन करण्यासाठी किमान चार सुरक्षारक्षक नेमावेत. हॉल व्यवस्थापनाने माइकची व्यवस्था करून त्यावरून उद्घोषणा करावी आणि वाहतूक कोंडी होऊ नये, याची सुरक्षारक्षकाने दक्षता घ्यावी. मंगल कार्यालय तसेच हॉटेलमधील कार्यक्रमांची अगाऊ माहिती वाहतूक विभागास कळवावी, अशा महत्त्वपूर्ण सूचनांची नोटीस हॉल तसेच हॉटेल व्यवस्थापनास देण्यात येत असल्याची माहिती पोलीस उपायुक्त डॉ. परोपकारी यांनी दिली. या सुचनांचे पालन करण्यात आले नाही आणि वाहतूक कोंडी होऊन नागरिकांची गैरसोय केल्याचे निदर्शनास आले तर अशा मंगल कार्यालय आणि हॉटेल मालकांविरूद्ध गुन्हा दाखल करून त्यांचे हॉलचे परवाने रद्द करण्यासंबंधीची कार्यवाही करण्यात येणार आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.