विठ्ठल जाधव या हवालदाराने मंगळवारी इगतपुरी पोलीस निवास वसाहतीत गळफास घेतल्यानंतर याप्रकरणी कौटुंबिक कलहातून त्यांनी आत्महत्या केल्याचे पोलीस निरीक्षकांनी म्हटले होते. या पाश्र्वभूमीवर हवालदाराच्या पत्नीने निरीक्षक संदीप कोळेकर आणि सहाय्यक उपनिरीक्षक ए. एम. खांडरे यांच्याविरूध्द येथील पोलीस ठाण्यात तक्रार दिली. या तक्रारीवरून कोळेकर आणि खांडरे यांच्याविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याबद्दल गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हे दोघे सातत्याने शारीरिक व मानसिक छळ करत हवालदाराला निलंबनाची नोटीस बजावल्याने आत्महत्या केली असल्याची फिर्याद मृत पोलीस हवालदाराच्या पत्नीने इगतपुरी पोलीस ठाण्यात दिली आहे.
पोलीस ठाण्यात कार्यरत हवालदार विठ्ठल जाधव यांनी मंगळवारी रात्री पोलीस निवास वसाहतीतील आपल्या खोलीत गळफास घेतला. याबाबत इगतपुरी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यू म्हणून नोंद करून सदर पोलिसाने कौटुंबिक कलहातून आत्महत्या केल्याचे दर्शविण्यात आले होते. परंतु बुधवारी हवालदाराची पत्नी छाया जाधव यांनी पोलीस ठाण्यात येऊन आमच्या घरात कोणताही कौटुंबिक वाद नसताना केवळ प्रकरण दडपण्यासाठी खोटे कारण समोर आणले जात असल्याचा आरोप केला. आपल्या पतीला निरीक्षक कोळेकर आणि सहाय्यक उपनिरीक्षक खांडरे यांनी सातत्याने शारीरिक व मानसिक त्रास दिला. त्यांना निलंबनाची नोटीस बजावली. त्यामुळेच त्यांनी आत्महत्या केली असल्याची तक्रार दिली.