राज्यातील दुष्काळी भागातील जनतेला पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्यासाठी व तलाव भरून घेण्यासाठी १०५ उपसा जलसिंचन योजना राबविल्या जाणार आहेत. त्यासाठी २२०० कोटी रुपयांचा प्रस्ताव केंद्र शासनाला पाठविला असून तो मंजूर करण्यासाठी प्रयत्नशील आहोत, असे प्रतिपादन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी सोमवारी सांगली येथे व्यक्त केले. जत पूर्व भागासाठी व आटपाडी तालुक्यात पिण्याचे पाणी देण्यासाठी ७३ कोटी रुपये देण्याबाबत कटिबध्द असल्याचेही त्यांनी यावेळी नमूद केले.
सांगली येथील जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या आवारात उभारण्यात आलेल्या कै. गुलाबराव पाटील यांच्या पूर्णाकृती पुतळ्याच्या अनावरप्रसंगी आयोजित सहकार मेळाव्यात मुख्यमंत्री चव्हाण बोलत होते. अध्यक्षस्थानी पालकमंत्री डॉ. पतंगराव कदम होते. केंद्रीय कोळसा राज्यमंत्री प्रतीक पाटील, सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील, ग्रामविकास मंत्री जयंत पाटील, गृह राज्यमंत्री सतेज पाटील उपस्थित होते.
राज्यातील सहकारी संस्थांची आर्थिक स्थिती सक्षम करण्यासाठी व सहकारी संस्था मजबूत करण्यासाठी सहकारी कायद्यात बदल केले जाणार आहेत, असा उल्लेख करून मुख्यमंत्री चव्हाण म्हणाले, केंद्र शासनाने ९७ व्या घटना दुरुस्तीमध्ये सहकार कायद्यात बदल करण्याचा निर्णय घेतलेला आहे. सहकारी संस्थांच्या स्वायततेवर बंधने येणार असून शासनाचा अंकुश कमी होणार आहे. या गोष्टी लक्षात घेऊन सहकार कायद्यात आवश्यक ते बदल करण्यासाठी राज्य शासनाचे प्रयत्न सुरू आहेत. या वर्षी पीक कर्जासाठी २५ हजार कोटी रुपयांचे वितरण करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. सवंग लोकप्रियतेसाठी कर्ज वाटल्यामुळे राज्यातील सहा बँका अडचणीत आल्या आहेत. राज्य सहकारी बँकेसंदर्भात करण्यात आलेली कारवाई उचित होती याचा पुनरुच्चार त्यांनी केला.
 पालकमंत्री डॉ. कदम म्हणाले, गुलाबराव पाटील यांच्या कारभारामुळे जिल्हा बँक राज्यात अग्रेसर ठरली. अयोग्य व्यवस्थापनामुळे राज्यातील सहकारी संस्था अडचणीत आल्या आहेत. हे चित्र बदलण्याची गरज आहे. जिल्ह्य़ातील दुष्काळी भागाला पाणी देण्यासाठी मुख्यमंत्र्यांचे प्रयत्न सुरू असून त्यांच्या मागे जिल्ह्य़ातील सर्वजण आहेत.
या मेळाव्यात आमदार सा. रे. पाटील यांना २०१२ सालचा तर माजी खासदार कल्लाप्पाण्णा आवाडे यांना २०१३ सालचा कै.गुलाबराव पाटील सहकार पुरस्कार पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते देण्यात आला. तर मोहनराव कदम यांना गुलाबराव पाटील ऋणानुबंध पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. गुलाबराव पाटील स्मृती ट्रस्टच्या वतीने राज्यातील सहकाराचे प्रशिक्षण देणाऱ्या संस्थेला पुरस्कार देण्यासाठी ५ लाख रुपयांचा धनादेश पृथ्वीराज पाटील यांनी मुख्यमंत्र्यांकडे सुपूर्द केला. बँकेचे प्रशासक शैलेश कोथमिरे यांनी स्वागत व प्रास्ताविक केले.