कल्याण डोंबिवली महापालिकेच्या महापौर वैजयंती गुजर यांचे प्रभाग क्रमांक २६ (रामबाग खडक) मधील जनसंपर्क कार्यालय पदपथावर उभारण्यात आल्याने एकच खळबळ उडाली आहे. याविषयी या भागातील काही नागरिकांनी महापालिकेत तक्रारी केल्या आहेत. परंतु या बेकायदा कार्यालयावर अद्याप कारवाई करण्यात आलेली नाही.
एका महिला संस्थेच्या नावाने हे कार्यालय चालविले जाते. याच कार्यालयातून महापौर वैजयंती गुजर आपले पक्षीय कामकाज पाहतात. पक्के बांधकाम असलेले हे कार्यालय येथील हिंदी शाळेजवळ पदपथावर आहे. या कार्यालयाची चांगली डागडुजी करण्यात आली आहे. अनधिकृत बांधकामप्रकरणी महापालिका अधिकाऱ्यांवर कारवाईचे आदेश देणाऱ्या महापौरांचा वावर बेकायदा कार्यालयात आढळून आल्याने खळबळ उडाली आहे.
महापौरांच्या पदपथावरील कार्यालयाबाबत यापूर्वी काही नागरिकांनी तक्रारी केल्या होत्या. पण त्या वेळी कोणतीही कारवाई झाली नाही. एका महिला संस्थेच्या नावाने हे कार्यालय चालविले जाते. ते आता महापौरांचे जनसंपर्क कार्यालय म्हणून ओळखले जाते.
शेवटी महापौरांचे कार्यालय, त्यामुळे कारवाई कोणी करायची, असा प्रश्न महापालिकेतील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने वृत्तान्तशी बोलताना उपस्थित केला.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा