प्रशासनाने नेहमीच समाजाभिमुख काम करावे. प्रशासन हे जनता आणि सरकारमधील दुवा आहे. परंतु हल्ली काही प्रशासकीय अधिकारी जनता आणि सरकारला सोडून यंत्रणा आपल्या दावणीला बांधतात. हे सातारा जिल्हय़ात चालवून घेणार नाही, असे मत सातारा जिल्हय़ाचे नवनियुक्त पालकमंत्री व जलसंपदामंत्री शशिकांत शिंदे यांनी ‘लोकसत्ता’ला सांगितले.
पालकमंत्री म्हणून साता-याचा कारभार हाती घेतल्यावर प्रशासकीय व पोलीस यंत्रणा गतिमान करण्यावर शिंदे यांनी भर दिला आहे. तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पातळीवर सर्व आामदार व खासदारांना सोबत घेऊन एकत्रित काम करणार असल्याचे सांगितले.
प्रशासनातील अनेक अधिकारी चांगले आहेत. त्यांनी त्यांच्या कार्यशैलीचा वापर करण्याची गरज आहे. ब-याचदा असे होताना दिसत नाही. असे सांगून शशिकांत शिंदे म्हणाले, मी हल्ली कोणाला सोडत नाही. सर्वाना बरोबर घेऊन काम करत आहे. जिल्हय़ात एका बाजूला अति पाऊस आणि दुस-या बाजूला दुष्काळ आहे. अशा विचित्र भौगोलिक परिस्थितीचा सामना आम्हाला करावा लागत आहे. त्यासाठी अति पावसाने धरणे भरल्यानंतर नदीतून सोडण्यात येणारे पाणी प्रथम दुष्काळी भागासाठी कालव्याद्वारे वापरण्याचा निर्णय घेतला. कोरेगाव, खटाव, माण, फलटण या भागांत हे पाणी पोहोचले आहे. हे पाणी दुष्काळी भागातील शेतीबरोबरच ओढे-नाले येथून सोडण्यात आले आहे. गाव तलाव, पाझर तलाव भरण्याचा प्रयत्न सुरू आहे.
जिल्हय़ात पक्षाने खूप काम केले आहे. ते जनतेपर्यंत पोहोचविण्याचा आमचा प्रयत्न राहील. दुष्काळातही पक्षाची कामगिरी भरीव स्वरूपाची राहिली, याची दखल सर्व स्तरावर घेण्यात आली. परंतु याचेही राजकारण करण्यात आले. वेळ आलीच तर मी कोरेगाव सोडून माणमधूनही उभा राहीन. सगळय़ांना बरोबर घेईन. टीम वर्कने काम करीन आणि माणची जागा जिंकूनच दाखवीन. मी काम करताना कोणताही दुजाभाव बाळगत नाही. सर्व पक्षांचे नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनाही वेळ देतो, तसेच पक्षाला प्राधान्य देतो.
सातारा जिल्हय़ातील महसूल व पोलीस यंत्रणेबद्दल माझ्याकडे अनेकांकडून तक्रारी येत होत्या. कार्यकर्ते, पदाधिकारी, सर्वसामान्य जनताही तक्रारी करत होती. मी याची गंभीर दखल घेतली. येथील यंत्रणा चालविण्याची जबाबदारी सरकारने प्रशासनाकडे दिली आहे, हातात घेण्याची नाही हे मी त्यांना समजावून सांगितले. मी जिल्हाधिकारी तसेच जिल्हा पोलीसप्रमुखांशी बोललो. सर्व वरिष्ठ अधिकारी, पोलीस प्रशासनाशी चर्चा केली. सर्वानी सहकार्याचे आश्वासन दिले आहे. सगळय़ांचा सात-बाराचा उतारा माझ्याकडे आहे. मी सगळय़ा विभागांची माहिती घेतो. अजून एक अधिकारी मला सरळ करायचाय. दोन-तीन दिवसांत हे काम करीन. नको त्या गोष्टी चालवून घेणार नाही, असे प्रशासनाला सांगितले आहे, असेही पालकमंत्री शिंदे यांनी सांगितले. या वेळी आमदार मकरंद पाटील, बाळासाहेब भिलारे, शशिकांत पिसाळ आदी उपस्थित होते.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा