जिल्हय़ातील सिद्धेश्वर, मोरवाडी व पूरजळ या तीन संयुक्त गावे पाणीपुरवठय़ाच्या वीजदेयकाची रक्कम न भरल्याने महावितरणने या योजनेची वीज खंडित केली. वीजदेयकाच्या मुद्दय़ावर आयोजित बैठकीत सरपंचांनी उन्हाळय़ात पाणीपुरवठा केल्याबद्दल पाणीपुरवठा विभागाचे आभार मानले. मात्र, वीजदेयकाची रक्कम भरण्यास असमर्थता दाखविली. साहजिकच पाणीपुरवठा विभाग चांगलाच अडचणीत सापडला आहे.
जिल्हय़ात असलेल्या २५ गावे मोरवाडी, २० गावे पूरजळ व २३ गावे सिद्धेश्वर प्रादेशिक पाणीयोजना जीवन प्राधिकरणामार्फत चालविण्यात येतात. परंतु गेल्या दहा वर्षांपासून केवळ टंचाईच्या नावाखाली चालू होतात व त्यांच्या वीजदेयकाचा मुद्दा गाजू लागतो. लाभक्षेत्रात सरपंच वीजदेयकाची रक्कम भरण्यास सहकार्य करीत नसल्याने या योजना नेहमीच वादग्रस्त ठरल्या आहेत. केवळ टंचाईच्या नावाखाली पाणीपुरवठा योजनांचा लाभ घेतल्याने वीजदेयकाची थकबाकी दोन कोटींवर गेली आहे.
जिल्हय़ात मागील वर्षी कमी पाऊस झाल्याने टंचाईच्या नावाखाली वीजदेयकाचे चालू बिल (४९ लाख) भरून उन्हाळय़ात योजना सुरू करण्यात आली. दरम्यान, या पुढील वीजदेयकाची रक्कम ग्रामपंचायतीने भरण्याचे ठरले होते. परंतु आता मात्र योजनेचे मे महिन्याचे वीजदेयक (सुमारे १२ लाख) थकल्याने १२ जूनला महावितरणने तिन्ही योजनांची वीज खंडित केली आहे. त्यामुळे पाणीयोजना बंद पडल्या आहेत. याच निमित्ताने ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता एबंडवार यांनी पाणीपुरवठा योजनेच्या लाभक्षेत्रातील सरपंच मंडळींची सोमवारी बैठक घेतली.
दरम्यान, उपस्थित सरपंचांनी उन्हाळय़ात प्रशासनाने पाण्याची सोय केल्याबद्दल आभार व्यक्त केले व वीजदेयकाची रक्कम भरण्यास असमर्थता दाखविले. २५ गावे मोरवाडी, २३ गावे सिद्धेश्वर, २० गावे पूरजळ या तीनही योजना वीजपुरवठा खंडित केल्याने बंद आहेत. सरपंचांनी वीजबिलाची थकबाकी भरण्यास बैठकीत नकार दिल्याने प्रशासन चांगलेच अडचणीत सापडले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा